ओझरखोल येथे एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात

संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल रत्नागिरी-चिपळूण एसटी बस आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या खासगी मिनी बसचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या  अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर मिनीबस चालक केबीनमध्येच अडकला होता. हा अपघात आज गुरूवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेनंतर अपघातस्थळी संगमेश्वर पोलीस, स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्कालीन सेवा तत्काळ दाखल झाल्या. जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक वाहनाच्या कॅबिनमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यालाही रत्नागिरीत हलवण्यात आले आहे. या मार्गावर अनेकवेळा अपघात होत असून, महामार्गावर वळण रस्ते आणि योग्य डायवर्शन नसल्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत. या अपघातांमुळे प्रवासी आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, महामार्ग ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा बोट ठेवले जात आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि वाहतूक विभागाने तत्काळ रस्त्यावर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software