जमिनीवर वारस नोंद करण्यासाठी ७० हजारांची लाच घेताना चहोलीचा तलाठी आणि खाजगी हस्तक लाचलुचपतच्या जाळ्यात!

पुणे: वडिलोपार्जित शेतजमिनीवर वडिलांची आणि काकांची वारस म्हणून नोंद करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चऱ्होली बुद्रुक येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि त्याच्या एका खाजगी हस्तकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही धडक कारवाई सोमवार, ८ जून २०२६ रोजी चहोली बुद्रुक येथील ग्राम महसूल कार्यालयात करण्यात आली. सुनील भिकाजी सातोसे (वय ४४, तलाठी) आणि नेमाजी माधवराव भोकरे (वय ४०, खाजगी इसम) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.  

या प्रकरणातील ३० वर्षीय तक्रारदार यांच्या आजोबांची चहोली बुद्रुक (तालुका हवेली) येथे वडिलोपार्जित जमीन आहे. आजोबांच्या निधनानंतर या शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर तक्रारदारांचे वडील व काका यांची वारस म्हणून नोंद करायची होती. यासाठी तक्रारदारांनी डिसेंबर २०२५ मध्ये तलाठी सुनील सातोसे यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर तक्रारदारांनी वारंवार चकरा मारूनही सातोसे याने वारस नोंद न करता त्यांना टाळले. अखेर २९ मे २०२६ रोजी तक्रारदार पुन्हा चौकशीसाठी गेले असता, सातोसे याने या कामासाठी सुरुवातीला तब्बल १ लाख ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती त्याने ८० हजार रुपयांवर आणली.  

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी १ जून २०२६ रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने ४ जून २०२६ रोजी चहोली येथे लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान तलाठी सुनील सातोसे याने आणखी तडजोड करत ७० हजार रुपयांची लाच मागितली आणि ही रक्कम त्याचा खाजगी हस्तक नेमाजी भोकरे याच्याकडे देण्यास सांगितले.  

लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर, ८ जून रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास एसीबीच्या पथकाने चऱ्होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात सापळा रचला. तलाठी सातोसे याच्या सांगण्यावरून खाजगी इसम नेमाजी भोकरे याने तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींविरुद्ध पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  

सदरची यशस्वी कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षकशिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे आणि तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त नीता मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.

Edited By: Nutan Bhise

खबरें और भी हैं

जमिनीवर वारस नोंद करण्यासाठी ७० हजारांची लाच घेताना चहोलीचा तलाठी आणि खाजगी हस्तक लाचलुचपतच्या जाळ्यात!

Latest News

जमिनीवर वारस नोंद करण्यासाठी ७० हजारांची लाच घेताना चहोलीचा तलाठी आणि खाजगी हस्तक लाचलुचपतच्या जाळ्यात! जमिनीवर वारस नोंद करण्यासाठी ७० हजारांची लाच घेताना चहोलीचा तलाठी आणि खाजगी हस्तक लाचलुचपतच्या जाळ्यात!
पुणे: वडिलोपार्जित शेतजमिनीवर वडिलांची आणि काकांची वारस म्हणून नोंद करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चऱ्होली बुद्रुक येथील ग्राम महसूल...
पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; खराडी येथून २१ लाखांच्या 'एमडी' ड्रग्जसह राजस्थानचा तस्कर जेरबंद
महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; ११ वीज मीटर जोडणीसाठी २ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक!
डिजिटल क्रांती की केवळ इंटरनेटचा बुडबुडा? कॉकरोच जनता पार्टीसमोर तरुणांना रस्त्यावर उतरवण्याचे मोठे आव्हान.
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी: ४ चोरीच्या दुचाकींसह संशयित जेरबंद, ४ गुन्हे उघडकीस

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software