मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करावीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण व विस्तारीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. शिर्डी व पुरंदर विमानतळाच्या कामाचा आढावा आज श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील विधानभवनातील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, मुख्य वित्त अधिकारी अनिशा गोदानी आदी उपस्थित होते. 

      शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरण व नुतनीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, शिर्डीतील विमानतळावरील नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत, नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे आगामी कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र, या कामांना गती देवून ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक वाटल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे. तसेच विमानतळासाठी आवश्यक असणारी खरेदी व स्ट्रक्चरल डिझाईनची कामे येत्या आठवड्यात पूर्ण करावीत. शिर्डी विमानतळ हे मुंबई व नवी मुंबई विमानतळाच्या जवळचे विमानतळ आहे. येथील लहान विमाने पार्किंगसाठी शिर्डी विमानतळाचा वापर होऊ शकतो. त्यादृष्टीने आतापासूनच शिर्डी विमानतळावर सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्यास आणखी जमिन संपादीत करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी दिले. 

पुरंदर विमानतळासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळासाठी लागणारी जमिन संपादीत करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुणे, जिल्हाधिकारी यांनी तातडीने सुरू करावी. जेणेकरून विमानतळाचे काम लवकर सुरू होईल. हे विमानतळ सुरू झाल्यावर महाराष्ट्रातील विमानसेवेचे जाळे आणखी विस्तारणार आहे, असेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्याठिकाणी मोठी विमाने उतरण्याची सोय असावी, त्यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी. या विमानतळावर विमानांच्या हँगरचीही व्यवस्था असावी, असे सांगितले.

 

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software