सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

पुणे: सांस्कृतिक कार्य विभागाच्या  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच  २० जुलै   पासून  २० ऑगस्ट २०२५ पर्यंत स्वीकारण्यात येतील असे संचालक मिनल जोगळेकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

      ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

      २७ ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील.  प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण ४४ शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख, दाने लाख  पन्नास हजार आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.   अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना  पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहनही सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software