कराड: सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून, कराड पोलिसांनी एका धडक कारवाईत तब्बल २ लाख १ हजार २५० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. कराड शहरातील शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या पुरुष साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री संभाजीराव पाटील यांनी आपल्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, शनिवारी २३ मे रोजी कार्यालयात हजर असताना उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना एक खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. कराड शहरातील शनिवार पेठ येथील ईदगाह मैदान रोड, शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी भागात परवीन इब्राहिम पटेल नावाची महिला तिच्या संदीप सतिश पाटील नावाच्या साथीदारासह गांजाची विक्री करत असल्याचे बातमीदाराने सांगितले.

 

WhatsApp Image 2026-05-24 at 6.45.52 PM

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून राजश्री संभाजीराव पाटील यांच्या आदेशाने सपोनि निलेश तारु यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी तातडीने छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी संशयितांकडून तब्बल ८.०५० किलोग्रॅम वजनाचा कॅनाबीस म्हणजेच गांजा हस्तगत केला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत बाजारभावाप्रमाणे २ लाख १ हजार २५० रुपये इतकी आहे.

 

या कारवाईनंतर पोलीस हवालदार सागर बर्गे यांनी सरकारतर्फे कराड शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून परवीन इब्राहिम पटेल आणि संदीप सतिश पाटील या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री संभाजीराव पाटील, सपोनि निलेश तारु, पोलीस हवालदार असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, स्वप्नील साबळे, मयुर देशमुख, मारुती लाटणे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सरीता मोहिते यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे कराड शहर आणि परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.