- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- निस्वार्थी मनाच्या शीतल चांदण्यात....
निस्वार्थी मनाच्या शीतल चांदण्यात....

माणसाला रोजच्या दैनंदिन कामकाजाच्या चक्रातून थोडं बाहेर पडावं व काही वेळा पुरतं तरी मुक्त व्हावं असं वाटत असतं. थोडक्यात ,थोडी बदलाची आवश्यकता असते. मलाही अशाच बदलाची गरज होती .रोज सकाळी लवकर उठून उरकून ८वाजता कामावर हजर होणं, रोजचा प्रवास अगदी कंटाळा आला होता.
झोप पुरेशी न झाल्याने वैतागलेल्या स्थितीमध्ये माझा प्रवास सुरू होता. कामावर जायला आज खरंतर थोडा उशीरच झाला होता. रोजच्या त्याच त्याच रुटीनला कंटाळून मी कामावर जात असताना माझं लक्ष रस्ता झाडणार्या स्त्रियांवर पडलं. किती लवकर उठून यांना यावं लागत असेल? आपला दिवस सुरू होण्याआधी यांचा दिवस सुरू झालेला असतो. यांना सुद्धा लवकर उठण्याचा, रोजच्या दैनंदिन चा कंटाळा येत नसेल का? त्यांचं काम स्वच्छ होतं. एकमेकींना सोबत करत ते समोरील काम पार पाडत होत्या. स्वच्छ रस्ता आत्ता चकाकत होता. त्या चकाकणाऱ्या रस्त्यावरून जाताना माझ्या मनावर असलेला ताण, वैतागलेपणा दूर झाला. त्या स्त्रियांची कामावरील निष्ठा, प्रेम त्या चकाकरणाऱ्या रस्त्यावरून प्रतिबिंबित होत होतं.
प्रत्येकाचं आपल्या कामावर प्रेम हवं, निष्ठा हवी, श्रद्धा हवी. वाचनालयासमोरील देवळातील गणपतीची मूर्ती जेव्हा मी पाहते त्यावेळी मला फक्त ती मूर्ती दिसत नाही तर तिथे ज्या ज्येष्ठ वयातील स्त्रिया सेवा देण्यासाठी येतात त्यांची सेवा दिसते. पहाटे ६ ते ८ या वेळेमध्ये या स्त्रिया एकत्र येतात. सडा, रांगोळी ,पूजा ,हार करणं, स्तोत्रपठण व आरती करणं ,प्रसादाची तयारी करणं इत्यादी कामे अगदी अविरत चालू असतात. ऊन असो ,थंडी असो व पाऊस असो त्यांची सेवा चालू असते. त्यांचं श्रद्धास्थान अढळ आहे आणि त्यांनी केलेली सेवा ही देवाला देवपण देते. प्रत्यक्ष देवाला कोणीही पाहिलेले नाही. पण माणसातील देव आपल्या भेटीला येतो. त्या स्त्रिया मन लावून आपलं काम करतात. एक एक फुल वेचून त्यांनी गणपतीसाठी बनवलेला हार हा गणपतीचे सौंदर्य अजून वाढवतो. या सर्व स्त्रियांची सेवाभावी वृत्ती देवळातच नाही तर आजूबाजूलाही एक सकारात्मक ऊर्जा पसरवते.
आपण जेव्हा अशी उदाहरणे पाहतो की ,जी आपल्या डोळ्यांसमोर घडत असतात. ती आपल्याला प्रेरणा देत असतात. आपल्याला अनेक सामाजिक बांधिलकीची जबाबदारीची जाणीव करून देतात.एक रिक्षावाले काका दररोज दुपारी ४ नंतर बिस्किटांचे पुडे घेऊन येत व दररोज ,अगदी नित्यनेमाने त्या कुत्र्यांच्या पिल्लांना खाऊ घालत. हे दृश्य मी जवळजवळ रोज बघत होते आणि निरीक्षणही करत होते. पिल्लांनाही आता त्या काकांची सवय झाली होती. ती पिल्ले ठराविक वेळ झाली की आतुरतेने त्यांची वाट पाहत बसत. कधी कधी काकांना कामामुळे उशीर होई पण त्यातूनही वेळ काढून ते येत व पिल्लांना खाऊ घालीत. काकांना उशीर झाला तर पिल्लांच्या डोळ्यात भेटीची आतुरता दिसे व आल्यावर भेटीचा आनंद.हेच खर निस्वार्थी प्रेम. आपल्या एका छोट्या कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला आनंद होत असेल तर तो आनंद समोरच्याला मिळवून देणं, त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरवणं खूप सुंदर गोष्ट आहे. या अशा निस्वार्थी प्रेमात एकमेकांबद्दल कोणत्याही ,कसल्याही अपेक्षा नसतात. दोघांमध्ये फक्त एक निखळ प्रेमाचा झरा वाहत असतो.
मुक्या जीवांबाबत प्रेम असणं, कणव असणं दयाभाव असणं, हे माणसाचं 'माणूस'असण्याचे लक्षण आहे. गौतम बुद्धांची शिकवण आपल्याला हेच तर शिकवते. लहान मुलांना घडवताना आई-वडिलांनी दिलेले संस्कार फार महत्त्वाचे असतात. एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी ते फार महत्त्वाचे असतात. असाच एक प्रसंग माझ्यासमोर घडला. कामानिमित्त जात असताना मला एक गाढव दिसलं. त्याच्या गळ्यातील बांधलेला दोरखंड एका हातगाडीच्या दांड्यात अडकला होता. ते गाढव सुटका करण्यासाठी धडपडत होतं. एक छोटा मुलगा व मुलगी तो दोरखंड सोडवत होते आणि आजूबाजूला असलेली मोठी माणसं ढुंकूनही न पाहता निघून जात होती. जणू आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. ती मुले न घाबरता त्या गाढवापाशी आली. व त्या हातगाड्याच्या दांड्यामधून दोरखंड काढू लागली. थोड्या प्रयत्नानंतर त्या मुलांनी त्या गाढवाला मोकळं केलं. या लहानग्यांना बघून माझे डोळे पाणावले. आपण लहान आहोत, आपल्या सोबत कोणीही मोठे माणूस नाही त्या गाढवाने अचानक हल्ला केला तर आपल्याला लागेल . असे भीतीदायक विचार त्या लहानगांच्या मनात क्षणभर सुद्धा आले नाहीत. ते वयाने लहान असले तरी त्यांचं मन मात्र मोठ्ठ निघालं. त्यांच्यावर झालेले संस्कार पक्के निघाले. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला 'माणूस 'म्हणून घडता येतं...
एक मोठे नामांकित प्रतिथयश डॉक्टर त्यांची आज या निमित्ताने आठवण झाली. वाई येथील डॉ.शरद अभ्यंकर असेच एक निर्मळ मनाचे परोपकारी व्यक्तिमत्व होते. दानशूर व्यक्तीमत्व,मोकळा स्वभाव, वाचनाची प्रचंड आवड असणारे एक सद् गृहस्थ.ज्ञानी व आर्थिक सुबत्ता असली तरी त्याचा त्यांना कसलाही अहंकार नव्हता.त्यांनी खूप जणांना मदत केली अगदी उदार होउन. एके दिवशी एक मुलगा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आला.तो डॉक्टरांना भेटला व रक्तदान करण्यासाठी आलो आहे असं म्हणाला.रक्तदान करून थोडे पैसे मिळावे या हेतूने तो आला होता.एका गरीब कुटुंबातील हा मुलगा दहावी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमा करत होता.नोकरी करत शिक्षण घेऊन आपल्या पायावर लवकर उभं रहावं म्हणून त्याची प्रामाणिकपणे धडपड सुरू होती.आत्ता सध्या तातडीची आवश्यकता असल्याकारणानें तो रक्तदान देण्यासाठी आला होता.डॉक्टरांनी त्याला काही पैसे दिले व रक्तदान करण्याची गरज नाही असे बोलले.डॉक्टरांनी एक दोन ठिकाणी बोलून एका ठिकाणी त्याला नोकरी मिळवून दिली.शिक्षण घेत आता तो नोकरी करु शकत होता.अधूनमधून सुट्टी असेल त्यावेळी तो डॉक्टरांना भेटत असे व तिथे वेळप्रसंगी मदतही करत असे. डॉक्टरांनी अशी अनेक कुटुंबे सावरली, उभी केली. याच डॉक्टरांनी केलेल्या अनेक कामांतील आणखी एक घटना इथे सांगाविशी वाटते.आसपासच्या परिसरात कातकरी समाजातील माणसे रहात होती.मासेमारी , खेकडे पकडून विकणे, छोटीमोठी कामे करणे ....अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालू होता.काही लागलं,खुपलं , आजारी पडलं तर ते डॉक्टरांकडे येत.डॉक्टर घेतली तर नाममात्र फी घेत कारण कातकरी अशिक्षीत असले तरी स्वाभिमानी होते.या माणसांना डॉक्टरांविषयी आदर होता ,अभिमान होता. याच समाजातील अवघडलेल्या स्त्रियांची बाळंतपणं डॉक्टरांनी मोफत केली तसेच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही असा हा देवमाणूस मी माझ्या डोळ्यांनी पाहिला.अनेक प्रसंगांतून त्यांची आठवण सदैव येत राहते.मदत केलेली काही माणसे जाण ठेवतात ,काही ठेवतही नाहीत म्हणून आपला चांगूलपणा आपण सोडायचा नसतो.
आपण प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तींना बघतो आणि प्रेरित होतो. काही काही लोक तर त्यांच्या नशिबाचा हेवा करतात. परंतु ,त्या प्रसिद्धीसाठी नशीब कारणीभूत आहे का? त्यामागील त्यांच्या परिश्रमांना काहीच बोल नाही का? त्यांनी घेतलेले अपार कष्ट ,मेहनत ,संकटांविरूध्द ठामपणे लढून ते 'त्या ' स्थानावर आलेले असतात. अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीला दोन वेळा जवळून भेटण्याचा मला दुग्धशर्करा योग आला. पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार प्राप्त ,भारतीय सामाजिक कार्यकर्ता व लेखिका सुधा मूर्ती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ब्रीदवाक्य त्यांना शोभून दिसते. त्या एक अभियांत्रिकी शिक्षिकाही आहेत. अभियांत्रिकी आणि लोकोमोटिव्ह कंपनी मध्ये नियुक्त केलेल्या त्या पहिल्या महिला अभियंता होत्या. त्यांचा तो तिथपर्यंतचा प्रवास खूप खडतर झालेला आपणास दिसून येतो शिक्षक असल्याने त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले तसेच अनेक सामाजिक कार्यात आपले मोलाचे योगदानही दिले. त्यांनी लिहिलेल्या गोष्टी माणसांच्या, तीन हजार टाके, सामानातले असामान्य , आयुष्याचे धडे गिरवताना इत्यादी अशा अनेक पुस्तकांमधून त्यांचे ' ''विस्तृत कार्य 'व जमविलेले 'माणुसकीचे धन 'आपणास पाहायला मिळते आज 'त्या 'अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांना जवळून पाहण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले. अशा अनेक व्यक्ती आपल्याला एकच तत्व शिकवतात ते म्हणजे 'माणुसकी 'व 'निस्वार्थ प्रेम'. मृत्यूनंतर जर काही शाश्वत गोष्ट शिल्लक राहत असेल तर ती प्रेम हे आहे. अशा अगणित व्यक्तींनी अनेकांना शाश्वत प्रेम देऊन त्यांच्या जीवनाला खोल अर्थ दिला आहे.बा.भ .बोरकरांची कविता माझ्या वाचनात आली.
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे होउनि जीवन
स्नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
खरेच ,कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता माणसात एक निरपेक्ष प्रेम नावाची गोष्ट असते. स्नेह ही खूप उदात्त गोष्ट आहे. जग तटस्थ होऊन न्याहाळले तर जीवनाच्या विविध अंगाचे दर्शन घडत असते. गौतम बुद्धांनी मैत्री भावना वृद्धिंगत होण्याला महत्व दिले आहे. मी तू पणा भेद निर्माण करतो ,पण तुझ्यात आणि माझ्यात काही वेगळे नाही ,परिस्थितीने आपण वेगवेगळे झालो असू ,पण आपण सदैव एकमेकांच्या हिताचा विचार केला पाहिजे ही भावना मन समाधानी करत जाते. अज्ञ लोकांना ज्ञानी बनवणारे जगातील करुणाशील लोक यांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत. झाडलोट करणाऱ्या कामगारापासून अनेकजण आपल्या कल्याणासाठी झटत असतात .निष्ठेने कर्तव्य करणारी आणि सगळ्यांचे भले चिंतणारी ही माणसे जेंव्हा निस्वार्थी असतात तेंव्हा ती मनाने खूप मोठी असतात. म्हणूनच आपण भोवताल नीट पाहून अशी माणसे मिळवून त्यांना समाधान दिले पाहिजे.त्यांचे कर्म त्यांना आनंद देते . म्हणूनच अहितकारी कर्म न करता सर्वांचे कल्याण करणारी माणसे हीच खरी तर निस्वार्थी ठरतात. दुःख समजून घेऊन दुःख निवारण करण्याचा छोटासा प्रयत्न करणारी माणसे उपयोगी ठरतात .दुःख वाढवणारी माणसे नसावीत .आधार देणारी ,प्रोत्साहित करणारी, दिलासा देणारी ,योग्य वेळी कौतुक करणारी ,संकटात उपयोगी पडणारी ,वेळेचा सदुपयोग करणारी ,निराशा दूर करून जीवन जगण्यास उत्साह देणारी ,अशी निर्मळ निस्वार्थी माणसे जे प्रेम देऊन जातात त्यामुळेच या विश्वाला सौख्य प्राप्त होते.
आपण दैनंदिन आपल्यात मनातल्या अनेक अंतर्गत संवेदनात मश्गुल झालेले असतो. सभोवतालचे जगात अनेक बरी वाईट माणसे भेटत असतात. जी स्वतः जाणतात की आपले आयुष्य खूप थोडे आहे ,यातच आपण चांगल्या गोष्टी करून स्वतः समाधानी व्हावे व इतरांना समाधान द्यावे. अशा व्यक्तींना अहंकार नसतो ,त्याचे मीपण नेहमीच विनम्र असते. मिळालेले जीवन बहुजन हिताय ,बहुजन सुखाय असे ते जगत असतात .त्यांच्या मनावर त्यांचे नियंत्रण असते ,ते मनाने भटकत नाहीत .चिंतनशील स्वभावाने ती माणसांची ,प्राण्यांची मने समजून घेतात .ते आळसी नसतात,ती माणसे कर्मयोगी असतात .ती साधी असतात ,ती संयमी असतात . भले कधी रागावतील पण ते देखील इतरांच्या हितासाठी.असे करुणाशील माणूसपण खरे तर प्रत्येकाच्या मनात असतेच ,पण मनाला भान देण्याचा अभ्यास झालेला नसल्याने ती स्वैर भटकतात ,कधी परिस्थितीने दबून जातात ,कधी संस्काराने माजोरी होतात.... या पार्श्वभूमीवर अशा भान हरपलेल्या मनाला सन्मार्गाला लावणारी निस्वार्थी प्रेमळ माणसे सर्वांच्या जीवनात पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल चांदणे देऊन जातात ..खरेच आपले मनही मग एक निस्वार्थी चंद्र होऊन जाते....आणि आनंदाचे टिपूर चांदणे मनात सभोवार पसरत जाते .

धनश्री निंबाळकर
एम.ए भाग २ (मराठी विभाग)
छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा.

खबरें और भी हैं
कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
