- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबईत २३ ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन; स्वतःच्या हाताने साकारता येणार बाप्प...
मुंबईत २३ ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन; स्वतःच्या हाताने साकारता येणार बाप्पाची मूर्ती
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे २३ ऑगस्ट रोजी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा. ₹३०० शुल्कात शाडू माती व साहित्य उपलब्ध, नाव नोंदणी सुरू.
मुंबई: महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृत घोषणा केल्यापासून या उत्सवाचा उत्साह आणि व्याप्ती अधिकच वाढली आहे. गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून ती आपल्या समृद्ध कला, परंपरा आणि सर्जनशीलतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज लक्षात घेता, नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व समजून सांगण्यासाठी आणि स्वतःच्या हाताने शाडूची मूर्ती बनवण्याचा आनंद देण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने येत्या २३ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईसह नागपूर, कोल्हापूर आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा पार पडणार आहेत.
यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर आता मुंबईतील प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रदर्शन हॉलमध्ये (पहिला मजला) २३ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा होणार आहे. आजच्या डिजिटल आणि स्क्रीनच्या युगात सतत मोबाईल मध्ये व्यस्त राहणाऱ्या हातांना थेट मातीचा स्पर्श व्हावा आणि प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचे समाधान मिळावे, हा या उपक्रमा मागील मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेमुळे विशेषतः तरुण पिढीमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवा बाबत मोठी जनजागृती निर्माण होणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक असून जागा अतिशय मर्यादित आहेत. सहभागासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले असून, यामध्ये सर्व सहभागींना मूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडूची माती आणि आवश्यक साहित्य आयोजकांकडून दिले जाणार आहे. तसेच कार्यşळा संपल्यानंतर सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. दरम्यान, यावर्षी राज्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा’ विस्तार थेट देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र, देश आणि जगभरात विविध विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांना भरघोस बक्षीसांच्या स्वरूपात प्रोत्साहन दिले जाणार आहे.
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करत आपल्या कलागुणांना योग्य वाव देण्यासाठी नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नाव नोंदणी करण्यासाठी ८७७९५८४२२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पु.ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई यांचेकडून करण्यात आले आहे.
