अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ऐतिहासिक मंदिराचे जतन आणि संवर्धन करताना त्याच्या मूळ ढाचाला किंवा वास्तूकलेला कोणताही धक्का न लावता काम करावे, अशा स्पष्ट आणि सक्त सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. नवरात्रोत्सवापूर्वी संवर्धनाशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करण्याबरोबरच मंदिराचा किरणोत्सव आणि गरुड मंडपाच्या उभारणी बाबतही प्रशासनाला विशेष निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, या मंदिरासोबत भक्तांच्या अगाध भावना गुंतलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे संवर्धन करत असताना पुरातत्त्व विभागाने केवळ तांत्रिक नियमांच्या पलीकडे जाऊन व्यापक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये. तसेच आगामी नवरात्रोत्सवापूर्वी अधिकाधिक कामे वेगाने पूर्ण करावीत. गरुड मंडपाची उभारणी वेळेत पूर्ण करावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्यकिरणांच्या मंदिरातील प्रवेशाला (किरणोत्सव) कोणतीही बाधा येणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

या महत्त्वाच्या बैठकीला आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोक माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पुरातत्त्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत मंदिर परिसर विकासाच्या आराखड्यावरही सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी माहिती देताना सांगितले की, मंदिर आराखड्यातील भूसंपादनासाठीच्या पहिल्या टप्प्यात ८९ नागरिक, १९५ व्यावसायिक आणि ५३ मिश्र स्वरूपाच्या मिळकतींचा समावेश आहे. या सर्व बाबींवर संबंधित मिळकतधारकांसोबत सविस्तर चर्चा करूनच पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, पुरातत्त्व विभागाकडून मंदिराचे जतन व संवर्धन हे सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकनांचे पालन करूनच केले जात असल्याचे डॉ. विलास वहाने यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

साताऱ्यात नवमतदारांसाठी विशेष मोहीम; १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान चार दिवस नोंदणी शिबिर

Latest News

साताऱ्यात नवमतदारांसाठी विशेष मोहीम; १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान चार दिवस नोंदणी शिबिर साताऱ्यात नवमतदारांसाठी विशेष मोहीम; १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान चार दिवस नोंदणी शिबिर
सातारा जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिर. १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १८ वर्षे पूर्ण...
नद्यांच्या संवर्धनाला मिळणार नवी दिशा; नाशिकमध्ये ‘महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान’चा शुभारंभ
दिल्लीच्या प्रदूषणाचे नवे गूढ उलगडले; हवामानाचा ५१ तासांचा ‘लग इफेक्ट’ संशोधनातून समोर
अंतराळात युद्धाची तयारी? अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव; कक्षेत शस्त्र तैनातीने खळबळ
गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून; बारामतीत खळबळ, दोन तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software