- Hindi News
- देश
- सीता के पती का नाम, नीता के पती का काम'; कुणाल कामराचा केंद्र सरकारवर घणाघात, व्हिडिओ व्हायरल
सीता के पती का नाम, नीता के पती का काम'; कुणाल कामराचा केंद्र सरकारवर घणाघात, व्हिडिओ व्हायरल
दिल्लीतील जंतर-मंतर येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' (NEET) मधील कथित घोटाळ्याविरोधात सीजेपी (CJP) संघटनेचे आंदोलन गेल्या २५ दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेला प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका विधानामुळे हे आंदोलन सध्या देशभरात चर्चेत आले आहे. केंद्र सरकारवर उपरोधिक शब्दांत टीका करताना कामरा याने केलेले वक्तव्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुणाल कामरा म्हणाला की, हे सरकार जे काही करत आहे ते नवीन नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून हाच प्रकार सुरू आहे. हे सरकार केवळ 'सीता के पती का नाम' (प्रभू श्रीरामाचे नाव) घेऊन 'नीता के पती का काम' (बड्या उद्योगपतींचे हित) साध्य करत असल्याचा थेट आरोप त्याने केला. कामरा यांच्या या विधानानंतर आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या हजारो तरुणांनी टाळ्या आणि घोषणाबाजी करत त्याला जोरदार दाद दिली.
या आंदोलनाला राजकीय आणि सामाजिक स्तरावरूनही मोठी ताकद मिळत असून, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनीही जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान, या घोटाळ्याच्या निषेधार्थ सीजेपी संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून, आगामी १६ जुलै रोजी सामूहिक उपोषणाची घोषणा केली आहे. कुणाल कामराच्या या धारदार राजकीय टिप्पणीमुळे सोशल मीडियावरील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून नेटकऱ्यांकडून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
