- Hindi News
- सातारा
- दहिवडीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडक अभियान; शेतजमिनींचे वादही सामोपचाराने निकाली
दहिवडीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडक अभियान; शेतजमिनींचे वादही सामोपचाराने निकाली
दहिवडी:
दहिवडी परिसरात गेल्या काही काळापासून विविध अवैध धंद्यांमुळे चर्चेत होता. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी येथील पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. अवैध दारू विक्री, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलिसांनी अलीकडील काळात अवैध दारू विक्रीच्या ठिकाणांवर तसेच मटका अड्ड्यांवर कारवाई करत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या मोहिमेमुळे बेकायदेशीर धंद्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
गुन्हेगारीवर कारवाईसोबतच सामाजिक सलोखा राखण्यावरही भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतजमिनींचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले वाद पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांना एकत्र बसवून सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे अनेक शेतकऱ्यांचा न्यायालयीन खर्च आणि वेळ वाचल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध धंद्यांविरोधातील सातत्यपूर्ण कारवायांमुळे परिसरातील बेकायदेशीर हालचाली कमी झाल्या असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही अधिक विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच जनतेशी संवाद साधत स्थानिक प्रश्न सोडविण्यावर भर दिल्याने दहिवडी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीची तालुक्यात चर्चा होत आहे.
अवैध धंद्यांविरोधातील कारवायांमुळे परिसरात मोठा बदल जाणवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे, अशी भावना काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
