- Hindi News
- पुणे
- शिरूरच्या रणांगणात आढळरावांची दमदार एन्ट्री; अमोल कोल्हेंना थेट विकासकामांचा हिशोब मागितला
शिरूरच्या रणांगणात आढळरावांची दमदार एन्ट्री; अमोल कोल्हेंना थेट विकासकामांचा हिशोब मागितला
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर डागली टीकेची तोफ.
शिरूर:पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली असून, म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना थेट आणि जोरदार आव्हान दिले आहे. आगामी शिरूर लोकसभा निवडणूक आपण निश्चितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट करत, मागील काही वर्षांत आपण मतदारसंघात ६०० कोटी रुपयांहून अधिक विकासकामे मार्गी लावली आहेत, मग त्या तुलनेत सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेला नेमका किती विकासकामांचा हिशोब दिला किंवा किती कामे केली, याचे उत्तर द्यावे, असा सवाल आढळराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. शिरूर येथे पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी सविस्तर बोलताना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या पाच वर्षांच्या काळात चाकण, आळंदी, जुन्नर, राजगुरूनगर, शिरूर आणि मंचर यांसारख्या प्रमुख ठिकाणच्या नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे यशस्वीपणे मार्गी लावली आहेत. नेहमी नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन काम केले असून भविष्यातही विकासाची हीच गती कायम ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच, पुणे–शिरूर रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे, तसेच बहुप्रतीक्षित नाशिक फाटा–राजगुरूनगर महामार्गाच्या कामाची वर्क ऑर्डर (कार्यादेश) लवकरात लवकर काढावी, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली. चाकण–कुरळी–भोसरी परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची सतत वाहतूक होत असल्याने या रस्त्याचे व मार्गाचे महत्त्व अतिशय अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पुणे–नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर आणि खेड या भागातूनच व्हावा यासाठी आपण नेहमीच शासनाकडे सातत्याने जोरदार पाठपुरावा केला होता, असेही त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेत भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे, नगरसेविका पूजा पोटावळे, सागर नरवडे, उमेश शेळके, संतोष थेऊरकर, दिनेश मांडगे, निलेश पवार आणि शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात, सुरेश गाडेकर, तुषार जांभळे यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडताना आढळराव म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विमानतळाचा प्रश्न, चाकणची गंभीर वाहतूक कोंडी यांसारख्या अनेक मुद्द्यांवर मते मागितली गेली, परंतु निवडून आल्यानंतर हे सर्व महत्त्वाचे विषय बाजूलाच पडले. विशेष म्हणजे, गाजावाजा करून आणलेल्या बहुचर्चित 'इंद्रायणी मेडिसिटी' प्रकल्पाचे पुढे नेमके काय झाले, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ निवडणुकांच्या काळात भावनिक प्रचार करणे आणि संसदेतील भाषणे सोशल मीडियावर व्हायरल करणे यावर जनतेचे दैनंदिन प्रश्न कधीच सुटत नाहीत, कारण केवळ भाषणे करण्यापेक्षा जमिनीवर प्रत्यक्ष विकासकामे उभी राहणे अधिक महत्त्वाचे असते, असा टोला त्यांनी लगावला. आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवणारच असल्याचा पुनरुच्चार करत, मतदारसंघातील गावागावांत आपला कायम संपर्क असून नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराची हद्दवाढ होणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज असल्याचे मत मांडतानाच, हद्दवाढ झाल्यास विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध होईल आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.
