- Hindi News
- सातारा
- अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा; ११ वर्षांची सक्तमजुरी आणि ६९ हजारांचा दंड
अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा; ११ वर्षांची सक्तमजुरी आणि ६९ हजारांचा दंड
दहिवडीतील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी गणेश गायकवाड याला वडूज न्यायालयाने सुनावली ११ वर्षांची सक्तमजुरी आणि ६९ हजारांचा दंड.
दहिवडी: दहिवडी पोलिसांनी दाखल केलेल्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वडूज यांनी आरोपीला एकूण ११ वर्षांची सक्तमजुरी तसेच ६९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ही घटना ६ डिसेंबर २०२१ रोजी माण तालुक्यात घडली होती. पीडित अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्याशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि तपासातील कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आरोपी नामे विचारे उर्फ गणेश दिनकर गायकवाड (वय २७, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) याला भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने एकूण ११ वर्षांची सक्तमजुरी, ६९ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी प्रभावी युक्तिवाद केला. दहिवडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आणि तपास अधिकारी यांनी तपासाची काटेकोरपणे पूर्तता केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रभावी तपासामुळे आरोपीला शिक्षा होण्यास मदत झाली.
या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्याचा न्यायव्यवस्थेचा स्पष्ट संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.
