- Hindi News
- पुणे
- पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त
पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे त्यातच पुण्यातील बिबवेवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात असणाऱ्या प्रसिद्ध हॉस्पिटलचा डॉक्टरच ड्रग्स तस्करी करत होता. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून मोहम्मद उर्फ अयान जरुन शेख (२७, रा. उंड्री) असे रुग्णालयात डॉक्टर असणाऱ्या आरोपीचे नाव आहे तर इतर दोघांची नावे सॅम्युअल बाळासाहेब प्रताप (२८, रा. हिंगणे खुर्द) आणि अनिकेत विठ्ठल कुडले (२७, रा. नारायण पेठ) अशी आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, त्यांच्याविरुद्ध १६ जुलै रोजी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलसमोर डॉक्टरसह तिघांना अटक केली आणि त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचे ५६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मोहम्मद शेख हा शहराच्या मध्यवर्ती भागातील एका प्रसिद्ध रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करत होता. तो मूळचा जम्मूचा रहिवासी आहे, त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. या आधी देखील त्याला बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. व त्याला डॉक्टर च्या पदावरून निलंबित करण्यात आले होते परंतू तरीही त्याने ड्रग्स ची तस्करी करणे थांबवले नाही.मोहम्मद शेख सोबत, कुडले यांनाही बंडगार्डन परिसरात ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. आणि आता दुसऱ्यांदा ते ड्रग्स तस्करीच्या प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्यावर बिबवेवाडी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी द फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, "पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की तीन जण एका कारमधून आले आहेत आणि बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलजवळ ड्रग्जची तस्करी करण्यासाठी उभे आहेत. माहितीवरून कारवाई करताना पोलिसांनी कारवर छापा टाकला. त्यांच्याकडे १५ लाख रुपयांचे एकूण ५६ ग्रॅम एमडी सापडले, ज्यामध्ये शेखकडून ५ लाख रुपयांचे एमडी, सॅम्युअल प्रतापकडून ६.३८ लाख रुपयांचे एमडी आणि कुडलेकडून ३.२५ लाख रुपयांचे एमडी जप्त केले आहे. यासोबतच, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत." त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

