- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- रायगडमध्ये काजू-आंबा लागवडीला वेग; शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नावर भर
रायगडमध्ये काजू-आंबा लागवडीला वेग; शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नावर भर
रायगड जिल्ह्यात 'मागेल त्याला काजू' व आंबा घन लागवड योजनेचा शुभारंभ. ३ वर्षांत ७० हजारांपर्यंत अनुदान; मंत्री भरत गोगावले यांचे शेतकऱ्यांना आवाहन.
रायगड : पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवडीसारख्या शाश्वत आणि फायदेशीर पर्यायांचा स्वीकार केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आंबा आणि काजू यांसारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या फळपिकांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले असून कृषी व फलोत्पादन विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील मौजे विन्हेरे येथील किशोर नारायण फाळके यांच्या शेतावर शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला काजू’ या योजने अंतर्गत ०.२० हेक्टर क्षेत्रावर आधुनिक सीआरए (CRA) तंत्रज्ञानाचा वापर करून काजू लागवडीचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. तसेच, मौजे नातोंडी येथील ज्ञानेश्वर सोनकर यांच्या शेतावर ‘व्हीजीबी-आरएएमजी’ (VGB-RAMG) योजनेअंतर्गत ०.२५ हेक्टर क्षेत्रावर आंबा घन लागवडीचा प्रारंभ रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, पंचायत समिती सभापती श्रीमती सावंत, पंचायत समिती सदस्य श्री. खिडबिडे व श्रीमती म. माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. खटकळे, तहसीलदार श्री. शितोळे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले म्हणाले की, अनेक भागांत शेती पडिक राहत असल्याचे चित्र पाहायला मिळते. अशा जमिनींवर फळबाग लागवड करून शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण केले पाहिजेत. व्हीजीबी-आरएएमजी योजने अंतर्गत आंबा घन लागवडीसाठी १०० झाडांपर्यंत तब्बल ७० हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षांच्या कालावधीत उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने आपली फळबाग विकसित करावी. कृषी आणि फलोत्पादन विभाग शेतकऱ्यांना आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी खात्री त्यांनी दिली.
शासनाची ‘मागेल त्याला काजू’ ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत वरदान ठरणारी आहे, असे नमूद करत ते पुढे म्हणाले की, काजू हे दीर्घकाळपर्यंत शाश्वत आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक असून, जनावरांकडून या पिकाचे होणारे नुकसान तुलनेने अत्यंत कमी असते. या योजनेअंतर्गतही शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा आणि काजू लागवड करून आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावे. भविष्यातील आधुनिक शेतीसाठी फळबाग लागवड हीच महत्त्वाची दिशा असून, या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.
