कोयना धरणातून विसर्ग कमी; नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन

कोयना धरणातील पाणीसाठा ८८ टक्क्यांवर. आज सहा दरवाजे १ फुटावर आणून ७,३९८ क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना खबरदारीचे आवाहन.

कऱ्हाड: पश्चिम महाराष्ट्राची लाइफलाईन समजल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या कोयना धरणातील पाणीसाठा आता ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. धरणाची पाणीपातळी सुरक्षित पातळीवर नियंत्रित राखण्यासाठी धरण व्यवस्थापनाने विसर्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज शनिवारी सायंकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांवरून खाली आणून एक फुटावर ठेवण्यात येणार आहेत. या दरवाज्यांमधून ६ हजार ३४८ क्युसेक इतका विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जाणार आहे. याशिवाय पायथा विद्युत गृहातील एक युनिटमधून सुरू असलेल्या १,०५० क्युसेक विसर्गासह नदीपात्रात एकूण ७ हजार ३९८ क्युसेक पाणी सोडले जाणार असून, यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याच्या शक्यतेने प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    सध्या धरणाची पाणीपातळी २१५३ फूट ९ इंच (६५६.४६३ मीटर) इतकी झाली असून धरणात ९२.७० टीएमसी (८८.०८ टक्के) एकूण, तर ८७.५८ टीएमसी (८७.४७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरणात सध्या १६ हजार ४६८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सतत सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी कोयना, नवजा आणि महाबळेश्वर परिसरात पावसाची नोंद अद्यापही मोठी आहे. आतापर्यंत कोयने येथे ३४४२ मिमी, नवजा येथे ४२४२ मिमी, तर महाबळेश्वर येथे ४२५२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक पूर्णपणे थांबलेली नाही.

    धरणातील सांडव्यावरील दरवाजे दोन फुटांवरून एक फुटावर आणल्यामुळे दरवाजातून होणारा विसर्ग जरी काहीसा कमी होणार असला, तरी पायथा विद्युतगृहातून सुरू असलेला विसर्ग कायम राहणार आहे. परिणामी कोयना नदीपात्रात ७ हजार ३९८ क्युसेक पाणी सतत वाहत राहील. आगामी काळात पावसाचे प्रमाण किंवा धरणातील आवक वाढल्यास सांडव्यावरील विसर्ग पुन्हा वाढविला जाऊ शकतो, अशी महत्त्वाची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी केवळ सध्याच्या विसर्गावर अवलंबून न राहता पुढील काही तासांतील पाऊस आणि धरणाच्या आवकेवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

   धरणातून सोडण्यात येणाऱ्या या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना अतिशय काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. कोणीही नदीपात्रात जाण्याचे धाडस करू नये, तसेच नदीकाठच्या गावातील ग्रामप्रशासन व स्थानिक यंत्रणांनी तातडीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सक्त सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत. पाणीसाठा झपाट्याने वाढत असताना पाण्याचा विसर्ग आणि नदीकाठच्या गावांची सुरक्षा या दोन्ही गोष्टी प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सणासुदीत महागाईचा तडाखा; डाळींसह साखरेचे दर वाढल्याने मिठाई महागणार

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software