दिल्लीत मोदी-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या विकासासह राजकीय विषयांवर चर्चा

नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात १ तास महत्त्वाची बैठक. महाराष्ट्रातील विकासप्रकल्प आणि राजकीय परिस्थितीवर आढावा.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अधिकारा बाबतची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या नवनिर्वाचित व इतर खासदारांसह नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांसाठी आयोजित केलेल्या विशेष अल्पोपाहार बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या प्रमुख खासदारांनी पंतप्रधानांची स्वतंत्रपणे भेट घेतली. तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील विविध विकासप्रकल्प, राज्यातील पावसाची सद्यस्थिती आणि मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला.

     या उच्चस्तरीय बैठकीला शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, ज्योती वाघमारे आणि संजय दिना पाटील यांच्यासह अनेक प्रमुख खासदार उपस्थित होते. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित सर्व नवीन खासदारांच्या मतदार संघांतील कामांची आग्रही विचारपूस केल्याचे सांगण्यात आले.

     भेट संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. पंतप्रधान तरुणांशी थेट संवाद साधत आहेत ही अत्यंत सकारात्मक बाब असून, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही तरुण हेच राष्ट्राचे खरे भविष्य असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे तरुणांशी सातत्याने संवाद होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच संसदेचे कामकाज वारंवार रोखल्याबद्दल त्यांनी विरोधी पक्षांवर अत्यंत आक्रमक शब्दांत ताशेरे ओढले. संसदेत कोणतेही मतभेद असले तरी चर्चा सभागृहातच व्हायला हवी, मात्र विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचा गैरवापर करून केवळ राजकीय स्वार्थ साधत आहेत, असा गंभीर आरोप शिंदेंनी केला. सुरुवातीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थी शांत झाले, तरीही विरोधक जाणीवपूर्वक या विषयाचे राजकारण करत असल्याचे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ठाकरे गटाचा खरोखरच न्यायसंस्थेवर आणि न्यायालयावर विश्वास आहे का, हे त्यांनी एकदा स्पष्ट केले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. यापूर्वीही सुनावणीच्या प्रत्येक टप्प्यावर ते पेढे वाटत असत आणि सरकार घटनाबाह्य असल्याचा कांगावा करत असत. परंतु, देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपले सरकार पूर्णपणे कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत स्थापन झाले असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे आजही तीच जुनी कॅसेट पुन्हा वाजवली जात असून, त्या सरकारचा आणि आमदारांचा कार्यकाळ आता यशस्वीपणे पूर्ण होत आला आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. या राजकीय भेटीमुळे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राष्ट्रवादीत नेतृत्वावरून संघर्ष? रुपाली ठोंबरे पाटलांचा तटकरेंवर थेट निशाणा

Latest News

राष्ट्रवादीत नेतृत्वावरून संघर्ष? रुपाली ठोंबरे पाटलांचा तटकरेंवर थेट निशाणा राष्ट्रवादीत नेतृत्वावरून संघर्ष? रुपाली ठोंबरे पाटलांचा तटकरेंवर थेट निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा सुनील तटकरेंवर थेट हल्ला. प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला पाठिंबा.
राष्ट्रवादीत नेतृत्वबदलाची चर्चा; प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर सुनील तटकरेंचा मोठा खुलासा
दिल्लीत मोदी-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या विकासासह राजकीय विषयांवर चर्चा
पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या
अभिजीत दीपकेंना मोठा धक्का; पोलिसांशी हुज्जत प्रकरणी पोलीस संरक्षण हटवण्याची मागणी

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software