- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Brent Crude) किमतींमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरेल ८३ डॉलरच्या पातळीवर आला आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल सलग तीन आठवड्यांपासून स्वस्त होत असले, तरी त्याचा थेट आणि मोठा दिलासा अजूनही भारतीय ग्राहकांना प्रत्यक्ष दरकपातीच्या रूपाने मिळताना दिसत नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे ताजे दर जाहीर केले असून, त्यानुसार देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर नजर टाकल्यास, मुंबईत पेट्रोल १११.१८ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपये, तर ठाण्यात पेट्रोल १११.३८ रुपये आणि डिझेल ९८.०० रुपये प्रति लिटर आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात पेट्रोल ११२.०४ रुपये आणि डिझेल ९८.६८ रुपये, तर नागपूरमध्ये पेट्रोल १११.८० रुपये आणि डिझेल ९८.४८ रुपये प्रति लिटर नोंदवले गेले आहे. याशिवाय नाशिकमध्ये पेट्रोल ११२.४४ रुपये आणि डिझेल ९९.०७ रुपये, कोल्हापूरमध्ये पेट्रोल ११२.५७ रुपये आणि डिझेल ९९.२३ रुपये, तर अमरावतीमध्ये पेट्रोल ११२.८९ रुपये आणि डिझेल ९९.५४ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
पारंपरिक इंधना सोबतच महाराष्ट्रातील विविध भागांत सीएनजीचे (CNG) दर देखील शहरांनुसार वेगवेगळे आहेत. मुंबई आणि ठाणे परिसरात सीएनजीचा दर ८६ रुपये प्रति किलो इतका असून, नागपूरमध्ये तो ८८.९० रुपये प्रति किलो नोंदवला गेला आहे. पुणे शहरात सीएनजी ९५.७५ ते ९६.५० रुपये प्रति किलो, नाशिकमध्ये ९६.५० रुपये प्रति किलो, तर कोल्हापूरमध्ये सीएनजी ९६.९५ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट होत असल्यामुळे, येत्या काळात देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होऊन वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
