- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- सिंधुदुर्ग बँकेत नोकरीची संधी; ३२ शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्ग बँकेत नोकरीची संधी; ३२ शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ३२ शिपाई पदांसाठी भरती जाहीर. १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना ३० ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार.
सिंधुदुर्ग: सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Sindhudurg District Central Co-op. Bank Ltd) एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने ‘शिपाई’ या संवर्गातील एकूण ३२ रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर या एजन्सीमार्फत ही संपूर्ण भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त मंडळाची किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे अनिवार्य आहे. तसेच, उमेदवाराचे वय २१ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेतील एक महत्त्वाचा निकष म्हणजे, उमेदवार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे अर्जदारांना सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले अधिवास प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक असेल.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२६ असून, या भरतीसाठी ६०० रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क केवळ ऑनलाईन पेमेंट मोडद्वारेच भरावयाचे असून ते नॉन-रिफंडेबल आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांना २ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लेखी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करता येणार आहे.
निवड प्रक्रिया आणि परीक्षा स्वरूपाबद्दल बोलायचे झाल्यास, ६ सप्टेंबर २०२६ रोजी ऑफलाईन (पेन आणि पेपर) पद्धतीने लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ७० गुणांची असून त्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. यात सहकार, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, मराठी भाषा ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवरील प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन १:३ या प्रमाणात पात्र ठरलेल्या उमेदवारांची ३० गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाईल, त्यानंतरच अंतिम निवड केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन विहित मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत. इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील सर्व अटी व शर्ती अधिकृत वेबसाईट वर वाचूनच अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
