पुण्यात २२ ऑगस्ट पासून महत्त्वाचा मार्ग बंद; प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर

पुण्यातील कौन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक रस्ता २२ ऑगस्टपासून बंद. वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्ग अन् ५ सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन.

पुणे: पुणे शहरातील वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडगार्डन वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या कौन्सिल हॉल चौकातून साधू वासवानी चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता आगामी २२ ऑगस्टपासून पुढील काही काळासाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांची गैरसोय टाळावी आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गही जाहीर करण्यात आले आहेत.

      पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, वाढती वाहतूक आणि इतर तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला असून, कौन्सिल हॉल चौकाकडून सरळ साधू वासवानी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना आता थेट प्रवेश असणार नाही. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी कौन्सिल हॉल चौकातून डावीकडे वळण घेऊन ब्लू नाईल चौकाकडून जाणे आवश्यक आहे. त्यानंतर तिथून उजवीकडे वळण घेऊन पुढे आयबी (IB) चौक मार्गे आपल्या इच्छित स्थळी जाता येणार आहे. या बदलामुळे वाहनचालकांना काहीसा वसावा लागणार असला, तरी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

      याचबरोबर, परिसरातील अंतर्गत रहदारी नियंत्रित करण्यासाठी किराट चौक ते मॅरेज ब्युरोकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या मार्गावर एकेरी (One-Way) वाहतूक सुरू करण्यात येत असून, एस.बी.आय. (SBI) बँकेकडून किराट चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी मॅरेज ब्युरोपासून डावीकडे वळून सरळ पुढे आपल्या गंतव्यस्थानाकडे जावे, अशा सूचना देण्यात आहेत. पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

दरम्यान, वाहतूक विभागाच्या या नव्या मार्गाबाबत किंवा बदलांबाबत नागरिकांच्या काही सूचना, हरकती किंवा प्रतिक्रिया असल्यास, त्या ५ सप्टेंबरपर्यंत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या सूचना वाहतूक शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड, पुणे या पत्त्यावर पाठवाव्यात, असेही कळविण्यात आले आहे. प्रशासनाच्या या बदलांमुळे नागरिकांनी प्रवास करताना संबंधित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

सिंधुदुर्ग बँकेत नोकरीची संधी; ३२ शिपाई पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software