- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पंकजा मुंडेंनी पक्षात सगेसोयरे आणू नयेत... मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
पंकजा मुंडेंनी पक्षात सगेसोयरे आणू नयेत... मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
जालना:
राज्यात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमनावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री केल्यास राज्यभरातील मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजकीय भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे मराठा आणि वंजारी या दोन समाजांमध्ये अंतर निर्माण झाले असून, अजित पवार यांनी स्वतः त्यांना दूर केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. त्यामुळे मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या हालचालींना मराठा समाजाकडून जोरदार विरोध केला जाईल, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही राजकीय निशाणा साधला. जालन्यातील भाजप आमदारांनी पालकमंत्री निधी वाटपाबाबत केलेल्या तक्रारींचा उल्लेख करत, पंकजा मुंडे यांनी निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समान पद्धतीने केले पाहिजे, असे जरांगे म्हणाले. पंकजा मुंडे यांनी पक्षात नातेवाईकशाही आणू नये, असा सल्ला देतानाच त्या थोड्या अहंकारी असल्या तरी खुनशी वृत्तीच्या नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
याशिवाय दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारने सकारात्मकतेने पाहिले पाहिजे, असे सांगत त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
