- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मराठी भाषा आणि बोलींच्या जतनासाठी नवीन योजना! परदेशात ७५ 'बृहन्महाराष्ट्र मंच' उभारणार
मराठी भाषा आणि बोलींच्या जतनासाठी नवीन योजना! परदेशात ७५ 'बृहन्महाराष्ट्र मंच' उभारणार
मुंबई:
मराठी भाषा, तिचे समृद्ध साहित्य आणि विविध प्रादेशिक बोलींच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेने एक अत्यंत प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता आणण्यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकांचे वेळापत्रक आधीच निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. संस्थेचा प्रशासकीय व वैधानिक बॅकलॉग पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत, आता मराठीच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
या बैठकीत मराठी भाषा आणि लोकसंस्कृतीच्या जतनासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक दस्तावेजांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामाला गती देण्याबाबत निश्चित धोरण ठरवण्यात आले. याशिवाय 'पुस्तकांचे गाव' आणि 'पेटी वाचनालय' या उपक्रमांचा विस्तार करून आदिवासी आणि सीमावर्ती भागातील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवणे, तसेच झाडीबोली आणि विदर्भातील नाट्यपरंपरेसाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्य संकुल उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडून ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. तसेच दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर आधारित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विविध भारतीय आणि जागतिक भाषांमधील सर्वोत्तम साहित्य मराठी भाषेत उपलब्ध व्हावे, यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने 'अनुवाद समिती' स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
