- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कारने पेट घेतल्याने ५ जणांचा जागीच जळून मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! कारने पेट घेतल्याने ५ जणांचा जागीच जळून मृत्यू
वर्धा:
समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरुळ गावाजवळ एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. इथेनॉलने भरलेला टँकर आणि भरधाव मालवाहू वाहनाची कारला झालेल्या भीषण धडकेनंतर कारने पेट घेतला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांसह तब्बल ५ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या आगीत कारमधील ४ प्रवाशांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर मालवाहू वाहनातील एका व्यक्तीचा जीव गेला आहे. या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात तातडीने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या भयानक घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावरून इथेनॉल घेऊन जाणारा एक टँकर अचानक उलटल्याने रस्त्यावरील वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला होता. याच दरम्यान विरुळ गावाजवळ येणाऱ्या एका भरधाव मालवाहू वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हे वाहन समोरून येणाऱ्या कारवर जाऊन जोरदार आदळले. ही धडक इतकी भयानक होती की, धडकेनंतर कारने लगेचच पेट घेतला. आगीच्या रौद्ररुपाने काहीच क्षणांत संपूर्ण कारला वेढल्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली असून, अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.
