- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- प्रियकराचा काटा काढला अन् मृतदेहावर २४ तास पाणी सोडलं; कल्याणमधील हत्येने खळबळ
प्रियकराचा काटा काढला अन् मृतदेहावर २४ तास पाणी सोडलं; कल्याणमधील हत्येने खळबळ
कल्याण:
कल्याण पूर्वेतील नीलकंठ सोसायटीत एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराची अतिशय क्रूरपणे हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत कोंबल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिनेमातील 'दृश्यम' स्टाईलचा वापर करत आरोपी महिलेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मृतदेह लवकरात लवकर सडावा आणि त्याची दुर्गंधी पसरू नये यासाठी तिने २४ तास बाथरूमचा नळ सुरू ठेवून मृतदेहावर पाणी सोडले होते. मात्र, तरीही परिसरात उग्र वास पसरल्याने ही भयंकर घटना उघडकीस आली.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बंद फ्लॅटमधून गेली अनेक दिवस दुर्गंधी येत असल्याने सोसायटीतील रहिवाशांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान, आरोपी महिलेने घरमालकाला 'बाथरूममध्ये डेड बॉडी ठेवली आहे' असा धक्कादायक व्हॉईस मेसेज (Voice Message) पाठवून कोलकात्याच्या दिशेने पळ काढला. घरमालकाने तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बंद फ्लॅटचे दार उघडले असता, बाथरूममध्ये गोणीत भरलेल्या अवस्थेत सडलेल्या स्वरूपातील मृतदेह आढळून आला.
या घटनेची गंभीर दखल घेत मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येमागचे नेमके कारण काय होते आणि या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. फरार झालेल्या आरोपी महिलेच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष तपास पथके रवाना केली असून, तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
