महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे आयोजित ‘स्वदेशी महोत्सव’ प्रदर्शनाचे उद्घाटन

खादीच्या स्वदेशी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद-ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन

पुणे: ग्रामीण भागातील कारागीर, उद्योजक आणि महिला स्वयंसहायता गटांना व्यासपीठ मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे पुना गोअन इन्स्टिट्यूट, नाना पेठ येथे आयोजित ‘स्वदेशी महोत्सव’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, लेखा परीक्षण अधिकारी शैलेंद्र कोलथरकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे, मंडळाचे लेखापाल अमर राऊत तसेच विविध ग्रामोद्योग संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

      सभापती  साठे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे केलेले आवाहन लक्षात घेऊन महामंडळामार्फत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढविणे हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी मंडळाची उद्दिष्टे आणि कार्ये याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे मुंबई व पुणे येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

‘स्वदेशी महोत्सव’ १४ ऑक्टोबरपर्यंत; खरेदीचे पुणेकरांना आवाहन

या प्रदर्शनात खादीचे कुर्ते, साड्या, पारंपरिक कपडे, मध, मसाले, पापड, लोणचे, कोल्हापुरी चप्पल, चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ, कंदील, सेंद्रीय साबण, तेल, वनौषधी, तसेच लोकरीपासून तयार झालेल्या घोंगड्या अशा विविध स्वदेशी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पुणेकर नागरिकांकडून या वस्तूंना मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण उत्पादकांना थेट बाजारपेठ मिळत आहे. हा स्वदेशी महोत्सव १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्वदेशी वस्तूंच्या खरेदीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

IPPB भरती २०२५: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत या पदांसाठी भरती

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software