- Hindi News
- पुणे
- कुख्यात गुंड निलेश घायवळच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा
कुख्यात गुंड निलेश घायवळच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून गेल्या काही दिवसांपूर्वी कोथरूड येथे गोळीबारची घटना घडली होती. यातूनच माकोका अंतर्गत कारवाईतून निलेश घायवळ हा परदेशात फरार झाला. आता याच निलेश घायवळच्या मुस्क्या आवळण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने गेल्या 2 दिवसांपासून त्याच्या पुण्यातील घरांवर छापे मारण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती काही कागदपत्रे लागली असून फरार होण्यासाठी त्याने फेक पासपोर्ट तयार केल्याचे देखील उघडकीस आले आहे. यावरून पुणे पोलीस आयुक्तालयाने त्याचे पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याच्या नावावरील बँक खाती देखील गोठवण्यास सांगितले आहे. छाप्या दरम्यान पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या, काडतूसे, रिकाम्या पुंगळ्या, साठेखत, घायवळच्या मालकीच्या मालमत्तेचे सातबारे हाती लागले आहेत. घायवळ च्या घरात जिवंत काडतूसे सापडल्याने त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे पोलिसांनी यावर कारवाई करण्यासाठी त्याच्या बेकायदेशीर मालमत्तेविरुद्ध महापालिकेला अधिकृत नोटीस पाठवली आहे. यावर महापालिकेने देखील कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलत त्याची अनधिकृत व थकीत कर असलेली मालमत्ता जप्त करणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.