- Hindi News
- पुणे
- 'के अँड क्यू परिवार' आयोजित 'स्पेस आउट - एक तास स्वतःसाठी खास' या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
'के अँड क्यू परिवार' आयोजित 'स्पेस आउट - एक तास स्वतःसाठी खास' या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

थांबण्यातूनच मिळते जगण्यासाठी ऊर्जा
पुणे : आपण सगळेच सतत पुढं जाण्यासाठी धावपळ करत असतो, पण काहीवेळ थांबण्यातूनच जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते, असं मत सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी व्यक्त केलं. के अँड क्यू परिवाराच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त 'स्पेस आउट - एक तास स्वतःसाठी खास' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कर्वे रस्त्यावरील गणेश सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात यावेळी के अँड क्यू परिवाराचे सत्येंद्र राठी, प्रमोद मालपाणी, अश्विनी धायगुडे, संध्या सोमाणी, देवेन भगत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

हनमघर म्हणाल्या, आपल्या जगण्याला अनैसर्गिक वेग आला आहे. तो वेग गरजेचा आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. या सगळ्यात आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो, कुणाला भेटलो तरी फोटो, व्हिडिओ काढत बसतो. डोळ्यांनी समोरचं पाहणं, अनुभवणं, भेटल्यावर आपुलकीनं चौकशी करणं हे या वेगामुळं कुठंतरी मागे पडत आहे. त्यामुळंच जगणं खऱ्या अर्थानं पुढं जाण्यासाठी स्वस्थ बसण्याची गरज आहे. स्वस्थ बसल्यावर स्वतःकडे नव्या नजरेनं पाहता येतं.सत्येंद्र राठी म्हणाले, कोरियन कलाकार वूप्सयांग यांनी निवांतपणाचं महत्त्व जाणून 'स्पेस आउट' ही स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेनं बीजिंग, तायपेई, हॉंगकॉंग, रॉटरडॅमसारख्या शहरासह जगभरात चळवळीचं रूप धारण केलं आहे. याच विचारातून भारतात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हनमघर यांच्या भाषणानंतर लगेचच स्वस्थ बसण्याचा तास सुरू झाला. हा तास संपल्यानंतर कुणाशी काहीही न बोलता या कार्यक्रमाची सांगता होऊन उपस्थित आपापल्या घरी परतले. सूत्रसंचालन तेजस्विनी गांधी यांनी केले, आभार सारिका खडलोया यांनी मानले.
प्रतिक्रिया
शांत बसू शकतो, हे लक्षात आलं!
शांत तेही एक तास सलग बसणं हेच मला कठीण वाटत होतं. त्यामुळंच या उपक्रमात मी सहभागी झालो आणि मी शांत बसू शकतो हे माझ्या नव्यानं लक्षात आलं. स्वस्थ बसण्यातून स्वतःतली शांतता अनुभवता आली.
साई घुमटकर, बारावी

खबरें और भी हैं
किसन वीर'चे गळित हंगाम २०२४-२५ चे ऊस बील आदा
खंबाटकी घाटात ट्रक बंद पडल्याने ट्राफिक जाम
