- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबई-पुण्यात मतदार यादीत मोठी कपात? ४१ लाख नावे वगळण्याची शक्यता
मुंबई-पुण्यात मतदार यादीत मोठी कपात? ४१ लाख नावे वगळण्याची शक्यता
महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनर्रीक्षण मोहिमेमुळे मोठी खळबळ. मुदतीत अर्ज न दिल्यास १ कोटी ८० लाख मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली जाण्याची शक्यता.
मुंबई: राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण (SIR) मोहिमेमुळे मोठी प्रशासकीय आणि राजकीय खळबळ उडाली आहे. विहित मुदतीत गणना अर्ज जमा न केल्यास राज्यातील तब्बल १ कोटी ८० लाख मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्वपक्षीय प्रतिनिधीं सोबत बैठक घेतल्यानंतर मंत्रालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही चिंताजनक माहिती दिली. गणना अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख महानगरांमधील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समोर आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात केवळ ६३ टक्के मतदारांची माहितीच अद्याप डिजिटाईज झाली असून, उर्वरित मतदारांचे गणना अर्ज अद्याप प्राप्त झालेले नाहीत. परिणामी, केवळ मुंबईतूनच तब्बल ३० लाख मतदारांची नावे प्रारूप यादीतून गायब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उर्वरित सात टक्के माहितीवर सध्या युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातही असाच मोठा धक्का बसणार असून, दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष तपासणीदरम्यान अनुपस्थित किंवा न आढळलेल्या तब्बल ११ लाख मतदारांची नावे आगामी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सर्व मतदारांच्या अनुपस्थितीचे कायदेशीर नियम पाळून तीन वेळा पंचनामे करण्यात आले आहेत आणि ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.
