- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मुंबई लोकलचा ताफा वाढणार; २३८ एसी लोकलची निर्मिती सुरू
मुंबई लोकलचा ताफा वाढणार; २३८ एसी लोकलची निर्मिती सुरू
मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ नवीन एसी लोकलची निर्मिती आता भारतीय रेल्वेच्या तीन कारखान्यांमध्ये होणार. २०२७ पासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार.
मुंबई: मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला अधिक आधुनिक, वेगवान आणि सुविधेचे बनवण्यासाठी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनने (MRVC) एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या २३८ वातानुकूलित (AC) लोकल रेकची निर्मिती आता खाजगी कंत्राट दाराकडून करून घेण्याचे टळले असून, त्याऐवजी ही निर्मिती थेट भारतीय रेल्वेच्या तीन प्रमुख उत्पादन कारखान्यांमध्ये समांतर पद्धतीने केली जाणार आहे. यामुळे रेक निर्मितीला वेग मिळणार असून, २०२७ पासून मुंबईकरांच्या सेवेत नवीन एसी रेक दाखल होण्यास सुरुवात होईल.
यापूर्वी २३८ अतिरिक्त एसी रेकच्या बांधणीसाठी खाजगी कंत्राट दाराची निविदा काढण्यात आली होती. मात्र, खाजगी प्रक्रियेद्वारे रेक उपलब्ध करून घेण्यास अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता होती. निविदा प्रक्रियेनंतर पहिला रेक तयार करून त्याच्या चाचण्या पूर्ण करण्यासाठीच सुमारे तीन वर्षांचा अवधी लागला असता, ज्यामुळे वेळेचे नियोजन बिघडले असते.
ही अडचण ओळखून एमआरव्हीसीने खासगी निविदा रद्द करत भारतीय रेल्वेच्या तीन प्रमुख कारखान्यांवर ही जबाबदारी सोपवली आहे:
- इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई
- रेल कोच फॅक्टरी (RCF), कपूरथळा
- मॉडर्न कोच फॅक्टरी (MCF), रायबरेली
या तीन कारखान्यांमध्ये एकाच वेळी रेकची समांतर बांधणी होणार असल्याने उत्पादकतेची क्षमता वाढेल आणि टप्प्याटप्प्याने रेक उपलब्ध होणे सुलभ होईल. २०२७ पासून रेक मिळण्यास सुरुवात होऊन २०३० पर्यंत सर्व २३८ एसी रेक रेल्वे ताफ्यात पूर्णपणे दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नवीन एसी लोकल रेक मोठ्या प्रमाणावर ताफ्यात दाखल होत असल्या तरी, सध्याची नॉन-एसी लोकल सेवा तातडीने बंद केली जाणार नाही, असा मोठा दिलासा दायक खुलासा एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास एस. वाडेकर यांनी केला आहे. सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेकडे एकूण २८५ रेक असून, त्यापैकी २३ एसी आणि २६२ नॉन-एसी रेक आहेत. भविष्यात नवीन एसी लोकल आल्या तरी प्रवाशांच्या सोयीसाठी एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही प्रकारच्या लोकल सेवा समांतर सुरू राहणार आहेत. सर्व लोकल एसी करण्याचा सध्या कोणताही स्वतंत्र निर्णय घेण्यात आलेला नाही.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या लोकल साठी केंद्र सरकारने २३८ वातानुकूलित लोकलला मंजुरी दिली आहे. मात्र, याआधीच्या खरेदी प्रक्रियेत अडचणी येत असल्याने आणि वेळापत्रक लांबणीवर पडत असल्याने हा नवीन व प्रभावी निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरीकडे, पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा, बोरीवली-विरार, कल्याण-बदलापूर, कल्याण-कसारा, बदलापूर-कर्जत आणि आसनगाव-कसारा या मार्गावरील कामांचा त्यात समावेश आहे. तसेच १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही चालू आहे. हे सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प आणि नवीन एसी रेकची उपलब्धता यांचा योग्य ताळमेळ साधून प्रवाशांना लवकरात लवकर दर्जेदार सेवा मिळवून देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
