- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नाशिक कुंभमेळ्यासाठी तयारीला वेग; दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
नाशिक कुंभमेळ्यासाठी तयारीला वेग; दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
नाशिक कुंभमेळ्याची तयारी अन् अतिवृष्टीने बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश.
मुंबई: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर हाती घेऊन तातडीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. तसेच आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली सर्व विकासकामे निश्चित वेळेत आणि उच्च दर्जाची असावीत, अशी तकीद त्यांनी संबंधित यंत्रणेला दिली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.
या महत्त्वाच्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (बांधकाम) आबासाहेब नागरगोजे, सचिव (रस्ते) शरद राजभोज यांच्यासह विभागाचे सर्व मुख्य अभियंता प्रत्यक्ष उपस्थित होते, तर राज्यातील सर्व अधीक्षक अभियंते दूरदृश्य प्रणालीद्वारे (वर्च्युअल पद्धतीने) या बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत प्रामुख्याने राज्यातील पावसाळी परिस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, रस्ते व पुलांची पुनर्बांधणी, नाशिक कुंभमेळ्याची तयारी, महामार्गा लगतची जनसुविधा केंद्रे आणि ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास आराखड्या’च्या जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांमधील दळणवळणात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मंत्री भोसले यांनी दुरुस्तीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितले. रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहून गेलेले रस्ते आणि पुलांच्या नुकसानीवर तातडीने तात्पुरत्या उपाययोजना करून नंतर कायमस्वरूपी दर्जेदार कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी नमूद केले. भविष्यातील हवामानातील बदल आणि पर्जन्यमानाचा शास्त्रीय अभ्यास करून रस्ते बांधणीचे नवे आराखडे तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले, जेणेकरून भविष्यात पूरस्थितीत रस्त्यांचे होणारे नुकसान टाळता येईल. यासोबतच रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक हवामानाला अनुकूल अशी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबवण्यावरही त्यांनी भर दिला.
आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या कालावधीत देश-विदेशातून लाखो भाविक आणि पर्यटक नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात येणार असल्याने, वाहतूक व्यवस्था व निवास सुविधांची कामे अत्यंत वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले. घोटी–त्र्यंबकेश्वर मार्ग, नाशिक रिंग रोड, ओझर विमानतळाशी संबंधित दळणवळण कामे, गेस्ट हाऊसचे बांधकाम, त्र्यंबकेश्वरमधील डी.पी. रस्ते आणि भूसंपादन प्रक्रियेचा आढावा यावेळी घेण्यात आला. कामाच्या घाईत गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा कडक दम देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामांच्या गुणवत्तेवर आणि तांत्रिक निकषांच्या पालनावर विशेष लक्ष ठेवावे, असे आदेश त्यांनी दिले.
तसेच प्रमुख महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रस्तावित जनसुविधा केंद्रांच्या (Jan Suvidha Kendra) कामांना गती देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. ‘महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना २०२५–२०४७’ अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याची गरज ओळखून भविष्योन्मुख रस्ते नेटवर्क तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कामांमध्ये वेग, दर्जेदार बांधकाम आणि नागरिकांची सुरक्षितता या त्रिसूत्रीवर भर देत विभागाने अधिक गतिमानतेने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
