- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ अनिवार्य; १ कोटींहून अध...
एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ अनिवार्य; १ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी पूर्ण
महाराष्ट्रात १ सप्टेंबरपासून एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय; १५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांची शाळांमध्ये नोंदणी.
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘लालपरी’चा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळाच्या या आधुनिक प्रवासाच्या संकल्पनेला प्रवाशांनी मोठा पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी यशस्वी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे आतापर्यंत सक्रिय (Active) झाली आहेत.
एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार पूर्णपणे कॅशलेस, पारदर्शक आणि सोपे करण्याच्या उद्देशाने महामंडळाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना हे स्मार्ट कार्ड वितरित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आगामी १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासात एनसीएमसी स्मार्ट कार्ड सक्तीचे (अनिवार्य) करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप या कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने जवळच्या आगार किंवा बसस्थानकावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
या डिजिटल परिवर्तना बाबत बोलताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, “सामान्यांची वाहिनी असलेली आमची ‘लालपरी’ काळानुरूप अधिक आधुनिक आणि प्रवाशाभिमुख बनवण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डला मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद प्रवाशांचा या डिजिटल व्यवस्थेवरील विश्वास दर्शवतो. भविष्यात एसटीच्या सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचवणे आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
१५ ऑगस्टपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष नोंदणी मोहीम
सामान्य प्रवाशां प्रमाणेच विद्यार्थ्यांच्या प्रवासालाही सुलभ करण्यासाठी १५ ऑगस्टपासून राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची विशेष प्रक्रिया सुरू केली जात आहे. यासाठी एसटी महामंडळाचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी थेट प्रत्येक शाळेत जाऊन ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी इतर कोणत्याही अनधिकृत ठिकाणी नोंदणी करू नये, असे स्पष्ट निर्देश महामंडळाने दिले आहेत. हे स्मार्ट कार्ड प्रवाशांना अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून सहज प्राप्त करता येणार असून, कार्ड रिचार्ज करण्याची सुविधाही याच माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
