अभिजीत दीपकेंना स्थानिकांचा तीव्र विरोध; दिल्लीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दिल्लीत रहिवासी सोसायटीच्या पार्कमध्ये 'जंतर मंतर सीझन २'च्या बैठकीसाठी जमलेल्या अभिजीत दीपके यांना स्थानिकांनी रोखले. पोलिसांच्या मध्यस्थीने परिसर रिकामा.

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्लीत एका रहिवासी सोसायटीच्या पार्कमध्ये स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला आहे. ‘जंतर मंतर सीझन २’च्या नियोजनासाठी गेलेल्या दीपके आणि त्यांच्या समर्थकांना सोसायटीतील नागरिकांनी रोखत पार्कमधून बाहेर जाण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. ‘हे जंतर मंतर नाही, इथे कसलीही नाटकबाजी चालणार नाही,’ असे म्हणत नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे तिथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि दीपके व त्यांच्या समर्थकांना तेथून निघून जावे लागले.

        या संपूर्ण प्रकरणा मागे आपल्याला जाणूनबुजून रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला आहे. सीजेपीच्या स्वयंसेवकांशी बैठक घेण्यासाठी त्यांना बंदिस्त जागेची आवश्यकता होती. मात्र, अनेक ठिकाणी विचारणा करूनही एकाही हॉल व्यवस्थापनाने त्यांना जागा देण्यास तयारी दाखवली नाही. काही ठिकाणी वरिष्ठांचा दबाव असल्याचे सांगण्यात आले, तर एका ठिकाणी हॉल बुक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हॉल मालकांनी भीतीपोटी बैठक घेण्यास नकार दिला. जर बैठक झाली तर ‘उलटे टांगले जाईल’, अशा धमक्या दिल्या गेल्याचा दावा दीपके यांनी केला आहे. हे सर्व भाजपच्या इशार्यावर होत असून विरोधकांना बैठका घेण्यासाठी पद्धतशीरपणे रोखले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नियमांनुसार सभागृहांमध्ये बैठक घेण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

          कुठलीही बंदिस्त जागा किंवा हॉल न मिळाल्यामुळे शेवटी दीपके हे त्यांचे सहकारी सौरभ दास, आशुतोष रांका आणि काही समर्थकांसह एका रहिवासी सोसायटीच्या पार्कमध्ये पोहोचले. तिथे ते ‘जंतर मंतर सीझन २’च्या नियोजनासाठी चर्चा करत होते. यावेळी एका चर्चेदरम्यान दीपके यांनी समर्थकांना पुढे कोणाचा राजीनामा हवा, असा प्रश्न विचारला असता, समर्थकांकडून ‘मोदींचा’ अशी घोषणाबाजी झाली. मात्र, सीजेपीचे समर्थक सोसायटीच्या पार्कमध्ये जमल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर तिथे गोळा झाले. हे रहिवाशांचे खासगी पार्क असून इथे कोणत्याही प्रकारचे राजकीय आंदोलन, निदर्शने किंवा बैठका चालणार नाहीत, असे स्पष्ट करत नागरिकांनी त्यांना तात्काळ बाहेर पडण्यास सांगितले.

       या मुद्यावरून सीजेपी समर्थक आणि स्थानिक नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि मोठा वाद झाला. रहिवाशांनी स्पष्ट शब्दांत येथे कोणताही गोंधळ किंवा हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी केली आणि गोंधळ शांत केला. त्यानंतर पोलीस मध्यस्थीने अभिजीत दीपके आणि त्यांच्या समर्थकांना तिथून निघून जावे लागले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, यावरून राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

भारतीय टपाल विभागात भरती; स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ६३ हजारांपर्यंत पगार

Latest News

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software