- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- ‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; एकनाथ शिंदेंचा संदेश
‘मराठी सक्तीची नव्हे, भक्तीची भाषा’; एकनाथ शिंदेंचा संदेश
ठाण्यात 'बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान' संपन्न. १.२५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांनी शिकली मराठी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक.
ठाणे: मराठी भाषा ही कोणतीही सक्ती नसून ती भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी भाषा स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची खरी ताकद आणि मोठे वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले. परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ या विशेष उपक्रमाच्या सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हा केवळ एका अभियानाचा समारोप नसून मराठीच्या अभिमानाची एक धडाकेबाज सुरुवात आहे. "महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा" हा महाराष्ट्राचा खरा जयघोष असून, मराठी भाषेची भक्ती ही संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र जोडणारी मोठी शक्ती आहे. तब्बल १०५ दिवस चाललेल्या या स्तुत्य अभियानातून तब्बल १ लाख २५ हजार रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून, या सर्व चालकांना समारंभात प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ‘लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी...’ या ओळींचा धागा पकडत त्यांनी मराठी ही आपली अस्मिता, स्वाभिमान आणि मायबोली असल्याचे सांगितले. कायद्याचा बडगा उगारण्या ऐवजी प्रेमाने आणि आपुलकीने भाषा शिकवण्याचा मार्ग परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वीकारल्याचे कौतुक करत, "कायद्याने नव्हे तर प्रेमाने भाषा शिकता येते," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी नेहमी मराठीतच संवाद साधावा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी बोलताना त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी स्वाभिमानाच्या विचारांचे स्मरण केले. तसेच राज्य शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे, लाडकी बहीण योजना, मुलींसाठी उच्च शिक्षणात सवलत, महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सूट, लेक लाडकी योजना आणि सरकारी कागद पत्रांमध्ये आईचे नाव अधिकृतपणे नोंदविण्याची मुभा देणारे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे महामंडळा’चा सध्याचा ५० कोटी रुपयांचा निधी भविष्यात वाढवून १,००० कोटींपर्यंत नेण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्पही त्यांनी यावेळी जाहीर केला. महाराष्ट्र आज उद्योग, स्टार्टअप, जीडीपी आणि परदेशी गुंतवणुकीत देशात अव्वल स्थानी असून दावोस परिषदेतही राज्यासाठी ३ ते ४ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या दिमाखदार सांगता सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मराठी भाषा सचिव किरण कुलकर्णी, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, अभियान समन्वयक सल्लागार डॉ. ज्योती ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी, विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने रिक्षा-टॅक्सी चालक बंधू-भगिनी उपस्थित होते. "मायबोलीची भक्ती आणि मराठीचा सन्मान हीच आपल्या महाराष्ट्राची खरी शक्ती आहे," असा संदेश यावेळी देण्यात आला.
