- Hindi News
- सातारा
- सातारा पालक मंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठांच्या हाती; देसाईंची सावध भूमिका
सातारा पालक मंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठांच्या हाती; देसाईंची सावध भूमिका
सातारा जिल्ह्याच्या पालक मंत्रिपदावर शंभूराज देसाईंची सावध भूमिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असेल असे स्पष्टीकरण.
सातारा: सातारा जिल्ह्याच्या पालक मंत्रिपदावरून राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चा आणि संभाव्य रस्सीखेचीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत सावध आणि संयमी भूमिका घेतली आहे. पालक मंत्रिपदाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असून, त्यांचे वरिष्ठ नेतृत्व जे काही ठरवेल तो निर्णय आपल्याला पूर्णपणे मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका शंभूराज देसाई यांनी मांडली आहे.
कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता पालकमंत्री असावा, याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यामुळे त्यांच्या अधिकार कक्षेबाबत कोणतीही उघड टिप्पणी करणे किंवा भाष्य करणे मला योग्य वाटत नाही, असे सांगत देसाई यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. महायुतीच्या वर्तुळात साताऱ्याच्या पालक मंत्रिपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू असताना, देसाई यांनी स्वतःहून कोणतीही उघड दावादारी किंवा अपेक्षा व्यक्त न करता थेट चेंडू महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात ढकलला आहे.
याचबरोबर, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांबाबत विचारले असता, त्यांनी अंतर्गत समन्वयावर भर दिला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात नुकतीच एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. त्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे सार्वजनिक करणे उचित नसले, तरी या वादावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच पडदा टाकला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार आपण सर्वजण ‘महायुती धर्म’ काटेकोरपणे पाळत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातील शिस्त व समन्वयाचा संदेश दिला.
शंभूराज देसाई यांनी पालक मंत्रिपदाच्या वादात कोणतीही उडी न घेता अतिशय सावध पवित्रा घेतल्यामुळे साताऱ्याच्या पालक मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत जिल्ह्यातील राजकीय उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. आता महायुतीचे शीर्षस्थ नेतृत्व यावर काय अंतिम निर्णय घेणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
