- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मराठी चित्रपटसृष्टीत सरकारची गुंतवणूक; ‘जेन झी’ला जोडण्याचा प्रयत्न
मराठी चित्रपटसृष्टीत सरकारची गुंतवणूक; ‘जेन झी’ला जोडण्याचा प्रयत्न
'जेन झी' प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या मराठी चित्रपटात महाराष्ट्र शासन गुंतवणूक करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा.
मुंबई: आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि नव्या काळातील डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून थेट ‘जेन झी’ (Gen Z) प्रेक्षक वर्गाला मोठ्या पडद्याकडे आकर्षित करणाऱ्या एका विशेष मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्र शासन थेट सहभाग घेणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष परिसंवादात ते बोलत होते.
मराठी चित्रपटांमध्ये उत्तम आशय, उच्च गुणवत्ता आणि दमदार अभिनयाची कोणतीही कमतरता नसली, तरी व्यावसायिक यश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘कनेक्टिंग लिंक’वर अधिक गांभीर्याने काम करण्याची गरज मंत्री शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. केवळ चित्रपटाची निर्मिती करून चालत नाही, तर उपलब्ध स्क्रीनची संख्या, योग्य वितरण व्यवस्था आणि नव्या प्रेक्षक वर्गाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठी एक व्यवहार्य व्यावसायिक मॉडेल तयार केल्यास राज्य सरकार त्यात सह-निर्माता किंवा गुंतवणूकदार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दक्षिण भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भावनिक प्रतिसादाचा दाखला देत, मराठी चित्रपटांनीही नव्या पिढीशी भावनिक नाते प्रस्थापित करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून त्याचे संधीत रूपांतर करण्यासाठी प्रात्यक्षिकासह कार्यशाळा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
या कार्यक्रमात बोलताना फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी चित्रपट हा केवळ करमणूक नसून कला, तंत्रज्ञान, अर्थकारण आणि संस्कृतीचा सुरेख संगम असल्याचे सांगितले. बदलत्या काळात चित्रनगरीची भूमिका केवळ चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण चित्रपट परिसंस्था विकसित करण्याची झाली आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही आणि ओटीटीच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपटाच्या आस्वादनाचे निकष बदलले आहेत. चित्र नगरीकडून पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’साठी पाच प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. महामंडळाच्या ५०व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने आयोजित या विचार मंथनामुळे मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा एकदा सुवर्णकाळ येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिसंवादास चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व कलाकार महेश मांजरेकर, अशोक राणे, मेघराज राजेभोसले, राजेश मापुस्कर, सुशांत शेलार यांच्यासह अनेक नामवंत चित्रकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
