- Hindi News
- देश
- रेल्वे स्थानकांवर धडक कारवाई; हजारो अनधिकृत बाटल्या, खाद्यपदार्थ जप्त
रेल्वे स्थानकांवर धडक कारवाई; हजारो अनधिकृत बाटल्या, खाद्यपदार्थ जप्त
आयआरसीटीसीकडून गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर अनधिकृत अन्न व पाण्याच्या विक्री विरोधात देशव्यापी मोहीम. हजारो पाण्याच्या बाटल्या व अन्न साठा जप्त.
नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ तसेच पेय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने अनधिकृत व परवाना नसलेल्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्री विरोधात विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. देशभरातील रेल्वेगाड्या आणि स्थानकांवर धडक कारवाई करत आयआरसीटीसीच्या पथकांनी हजारो अनधिकृत पाण्याच्या बाटल्या आणि अमान्य खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. प्रवाशांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि रेल्वे खानपान सेवांमध्ये अन्न सुरक्षा, स्वच्छता व परवाना नियमांचे काटेकोर पालन व्हावे, हा या व्यापक मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
या विशेष मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या समन्वयाने सर्व झोनमध्ये विशेष ‘क्विक रिस्पॉन्स टीम्स’ (QRT) तयार करण्यात आल्या आहेत. ही पथके रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानके तसेच केटरिंग युनिट्सची अचानक तपासणी करत आहेत. तपासणी दरम्यान संबंधित युनिटकडे कायदेशीर परवाना, आवश्यक अधिकृत परवानग्या, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि इतर निर्धारित निकषांची पूर्तता होत असल्याची काटेकोर खात्री केली जात आहे.
या देशव्यापी मोहिमे अंतर्गत विविध रेल्वे विभागांत मोठी कारवाई करण्यात आली आहे. लखनौ विभागात २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ११७ रेल्वेगाड्यांची सखोल तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये मंजुरी नसलेल्या ब्रँडच्या तब्बल ५,२४१ पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. चंदीगड विभागातील अंबाला, लुधियाना, अमृतसर, कटरा आणि जम्मू यांसारख्या प्रमुख स्थानकांवर ५१ गाड्यांची तपासणी करून ३,१०८ अनधिकृत पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच, अंबाला आणि सहारनपूर येथे अचानक तपासणी करत आइसक्रीम व फ्लेवर्ड मिल्कचे अनधिकृत साठे जप्त करण्यात आले. साबरमती रेल्वे स्थानकावर ९ ऑगस्ट रोजी अचानक तपासणी करून ट्रेन साईड व्हेंडिंगद्वारे अनधिकृत पाणी व ताक चढवले जात असल्याचे उघडकीस आणत आयआरसीटीसीच्या पथकाने हे साहित्य जप्त केले. याशिवाय, हावडा, गुवाहाटी, कामाख्या, अगरतळा, कटिहार, न्यू जलपाईगुडी आणि डिब्रुगड भागातही नियमित आणि ऑनबोर्ड तपासण्या करत अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, खाद्यपदार्थ, जादा दर आकारणी आणि स्वच्छतेच्या निकषांवर कडक कारवाई करण्यात आली.
अनधिकृत खाद्यपदार्थ किंवा पेये रेल्वेत कोण-कोणत्याही स्वरूपात चढवू नयेत, साठवू नयेत किंवा विकू नयेत, अशा स्पष्ट व सक्त सूचना सर्व केटरिंग सेवा पुरवठादारांना देण्यात आल्या आहेत. निर्धारित नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित परवाना आणि कराराच्या अटींनुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही आयआरसीटीसीने दिला आहे. या मोहिमे मुळे रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि उच्च दर्जाची खानपान सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
