- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवातीला सरकारमधूनच मदत? छगन भुजबळांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ
जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवातीला सरकारमधूनच मदत? छगन भुजबळांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ
मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर छगन भुजबळ यांची कडाडून टीका. सुरुवातीला सरकारमधील मंत्र्यांनीच मदत केल्याचा खळबळजनक दावा.
मुंबई: राज्यभरात लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे आणि गणेशोत्सवाच्या उत्साहामुळे आनंदाचे वातावरण असतानाच, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी मुंबई आंदोलना वरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत येऊन आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधत, जरांगे यांच्या या भूमिकेमुळे मुंबईत मोठी अराजकता निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशारा दिला आहे
सध्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाल्याची चर्चा असली तरी प्रकृती बिघडल्यामुळे सध्या ते पोटोद्यामध्ये उपचार घेत आहेत. त्यांचा आगामी मुंबई दौरा होईल किंवा नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. परंतु, यावर भाष्य करताना मंत्री छगन भुजबळ यांनी थेट शब्दांत विरोध दर्शवला आहे. सध्या मुंबईत गणेशोत्सवा मुळे लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होत असताना अशा वेळी शहरात आंदोलन करणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण करणे आहे, असे भुजबळ म्हणाले. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे मुंबईत एक प्रकारे अराजकता निर्माण होईल, त्यामुळे त्यांनी जिथे आहेत तिथे विश्रांती घ्यावी आणि प्रकृतीची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. जरांगे हे कोणाचेही ऐकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात सरकारमधील काही मंत्र्यांनी आणि आमदारांनीच मनोज जरांगे यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. मंत्री आणि आमदार त्यांच्यासमोर जाऊन हात जोडत होते, समोर कॅमेरे असताना विनवण्या करत होते, ज्यामुळे जरांगे यांना आपण खूप मोठे नेते असल्याचा भास होऊ लागला. काही वर्षांपूर्वी त्यांच्या काही मागण्या संयुक्तिक वाटल्या असाव्यात, त्यामुळे त्यावेळी अनेकांनी त्यांना सहकार्य केले. परंतु आता मारुतीच्या शेपटाप्रमाणे त्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, असा आरोप भुजबळ यांनी केला. आधी ते केवळ मलाच लक्ष्य करून शिव्या देत होते, परंतु आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनाच टार्गेट करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे यांचा हा हट्टीपणा आणि जिद्द मराठा समाजाला अंधारात नेणारी आणि दिशाभूल करणारी असल्याचे भुजबळ यांनी म्हटले. आरक्षणा बाबत बोलताना ते म्हणाले की, ईडब्लूएस (EWS) आरक्षण सुरू झाल्यानंतर अनेक घटकांमधील लढा थांबला आहे. राज्यात साडेतीन ते पावणेचारशे जातींचा वर्ग असताना आरक्षण अमर्याद वाढवता येत नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. एक वेगळे आरक्षण आधीच दिले गेले आहे, आणि कालच आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीतही स्पष्ट केले आहे की, कुणालाही काहीही अडचण असल्यास त्यावर मार्ग काढू शकतो, परंतु शिक्षणासाठी आपण सर्वसमावेशक मदत करायला हवी. पुढची पिढी ही सुशिक्षित आणि सक्षम झाली पाहिजे, असे सांगतानाच जरांगे यांच्याकडे सुशिक्षितपणा आणि संस्कृतीचा अभाव असल्याची टीका करत भुजबळांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
