- Hindi News
- पुणे
- गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा; पीएमपी-मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत, ६२६ जादा बसेस धावणार
गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा; पीएमपी-मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत, ६२६ जादा बसेस धावणार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पीएमपी आणि मेट्रो सेवा मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार. ६२६ जादा बसेसची सोय; कोणतीही भाडेवाढ नाही.
पुणे: लाडक्या बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण पुणे शहर भक्तीमय आणि चैतन्यमय झाले आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि शहरात सजावटीचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पुण्यात दाखल होत असतात. गणेशोत्सवाच्या या काळात भाविकांची होणारी गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आणि महामेट्रोने अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेतले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात भाविकांना कोणत्याही प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी पीएमपी कडून कोणतीही भाडेवाढ न करता तब्बल ६२६ जादा बसेस सोडण्यात येणार असून, रात्रीची बससेवा मध्यरात्री दोनपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात १७ ते २५ सप्टेंबर दरम्यान ही विशेष बससेवा कार्यान्वित राहणार असून, १९ सप्टेंबरपासून रात्रीची बससेवा चक्क मध्यरात्री दोन वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे, या विशेष सेवेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा भाडेवाढ आकारली जाणार नाही, तर नियमित तिकीट दरात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि टिळक रोडवरील वाहतूक व्यवस्था बदलण्यात येणार असल्याने, पीएमपीच्या नियमित बसमार्गां मध्येही गरजे नुसार आवश्यक बदल केले जाणार आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका भवन, डेक्कन आणि स्वारगेट या प्रमुख स्थानकांवरून अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, गर्दी वाढल्यास मागणी नुसार आणखी बसेस रस्त्यावर उतरवण्याची पूर्ण तयारी प्रशासनाने ठेवली आहे. याशिवाय, पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांसाठीही १७ ते २५ सप्टेंबर दरम्यान स्वतंत्रपणे १४७ जादा बसेस सोडल्या जाणार आहेत.
केवळ बससेवाच नव्हे, तर पुणे मेट्रोनेही प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला प्रतिसाद देत आपले विशेष वेळापत्रक जाहीर केले आहे. १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान मेट्रोची सेवा नेहमी प्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहिली आहे. परंतु, उत्सवाचा मुख्य काळ लक्षात घेता १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजल्यापासून थेट मध्यरात्री २ वाजेपर्यंत प्रवाशांच्यासाठी उपलब्ध असणार आहे. मेट्रोला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता महामेट्रोने गर्दीच्या वेळी मेट्रोची वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गर्दीच्या वेळेत अवघ्या दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत वेगवान आणि सुलभ होणार आहे. गणेशोत्सवा दरम्यान मेट्रो स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी आपले मोबाईल, पाकीट, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळून ठेवाव्यात, असे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे. पीएमपी आणि मेट्रोच्या या समन्वित आणि सुसज्ज नियोजनामुळे यंदा पुणेकरांचा व राज्यभरातून येणाऱ्या भाविकांचा गणेशोत्सवातील प्रवास अत्यंत सुखकर आणि विनासायास होणार आहे.
