- Hindi News
- सातारा
- शेवरीत आर्थिक-डिजिटल साक्षरतेचा जागर; नाबार्ड व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जनजागृती उपक्रम
शेवरीत आर्थिक-डिजिटल साक्षरतेचा जागर; नाबार्ड व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जनजागृती उपक्रम
साताऱ्यातील शेवरी येथे नाबार्ड व सातारा जिल्हा बँकेतर्फे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर. सायबर सुरक्षितता व बचतीबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन.
दहिवडी: ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक सक्षमीकरण रुजवण्यासाठी आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल व्यवहारां बाबत सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुक्यातील शेवरी येथे एका विशेष आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, याद्वारे नागरिकांना सुदृढ आर्थिक नियोजन, बचत, सुरक्षित कर्ज व्यवस्थापन आणि सायबर फसवणुकीपासून बचावाचे महत्त्वाचे धडे देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात करताना तज्ज्ञांनी आर्थिक साक्षरतेचे खरे महत्त्व विशद केले. केवळ पैसा कमावणे म्हणजे आर्थिक स्थैर्य नव्हे, तर मिळालेल्या पैशांचे योग्य नियोजन करणे, भविष्यासाठी नियमित बचत करण्याची सवय लावणे आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी आपल्या उत्पन्नानुसार काटेकोर मासिक अंदाजपत्रक तयार करून सर्व प्रकारचा अनावश्यक खर्च टाळावा, असा सल्ला देण्यात आला. तसेच, भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण भासल्यास बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेताना व्याजदर, परतफेडीच्या अटी आणि कर्जाचा निश्चित कालावधी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करूनच निर्णय घ्यावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या काळात वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या युगात सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही वेगाने वाढले आहे, त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे यावेळी आवर्जून सांगण्यात आले. कोणत्याही ओळखीच्या किंवा अनपेक्षित व्यक्तीला आपला ओटीपी, एटीएम पिन, सीव्हीव्ही क्रमांक, पासवर्ड किंवा बँक खात्याची कोणतीही गोपनीय माहिती फोनवर किंवा मेसेजद्वारे अजिबात सांगू नये. मोबाईलवर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करणे कटाक्षचने टाळावे. बँकेचे केवायसी (KYC) तातडीने अद्ययावत करण्याच्या नावाखाली येणारे बनावट मेसेज, लॉटरी लागल्याचे किंवा मोफत भेटवस्तूंचे आमिष दाखवणारे कॉल्स तसेच घरबसल्या अर्धवेळ नोकरीतून (Part-time job) भरघोस कमाईचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांपासून नागरिकांनी सावध राहावे, असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला.
या महत्त्वाच्या शिबिरामध्ये विभागीय विकास अधिकारी भाऊसो शिंगाडे, विकास अधिकारी आजिनाथ भवारी, शाखा प्रमुख सतीश शिंदे, तसेच लिपिक संजय खाडे, अमीर मुलानी, सुजित शिंदे आणि माण तालुका समन्वयक सागर पवार यांनी उपस्थित नागरिकांना विविध योजनांची आणि डिजिटल सुरक्षिततेची सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे, त्यांना बँकेच्या विविध उपक्रमांशी जोडणे आणि सायबर गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करणे या प्रमुख उद्देशाने पार पडलेल्या या शिबिरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये एक सकारात्मक व जागरूक वातावरण निर्माण झाले आहे.
