- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- शरद पवारांच्या भेटीला राजकीय रंग नाही – वळसे पाटील
शरद पवारांच्या भेटीला राजकीय रंग नाही – वळसे पाटील
पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी भेट घेतल्याचे केले स्पष्ट.
मुंबई : राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत वेग आला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, या चर्चांवर स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण देत ही भेट पूर्णपणे गैरराजकीय असल्याचे स्पष्ट केले.
माध्यमांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ही भेट पूर्वनियोजित होती आणि तिचा उद्देश केवळ रयत शिक्षण संस्थेच्या कामकाजासंदर्भातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे हा होता. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रामशेठ ठाकूर, विश्वजीत कदम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ अर्पण केला तसेच त्यांचे आशीर्वाद घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
'राजकीय चर्चा झालीच नाही'
भेटीदरम्यान कोणत्याही राजकीय घडामोडींवर चर्चा झालेली नसल्याचे सांगताना वळसे पाटील म्हणाले, "ही बैठक केवळ रयत शिक्षण संस्थेच्या विषयांपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे राजकीय चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणताही नवा गुरुमंत्र मिळालेला नाही. शरद पवार नेहमीप्रमाणे 'जनतेसाठी चांगले काम करत राहा' हाच संदेश देतात."
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नावर वळसे पाटील यांनी सावध भूमिका घेतली. "उगाच एखाद्या विषयाला फाटे फोडण्याचे कारण नाही. शरद पवार आमचे गुरु आहेत. मोठ्यांचे आशीर्वाद घेणे ही आपली परंपरा आहे. त्याचप्रमाणे मी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याही भेटीस जाणार आहे," असे ते म्हणाले.
दोन्ही पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत मला कोणतीही माहिती नाही. त्या विषयावर आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य वेळी भूमिका स्पष्ट करतील, असे सांगत त्यांनी सध्याच्या चर्चांवर भाष्य करण्याचे टाळले.
'राजकीय भूमिका आणि वैयक्तिक संबंध वेगळे'
राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध यांची गल्लत करू नये, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. "राजकारणात भूमिका वेगळ्या असू शकतात, पण वैयक्तिक संबंध कायम जपले जातात," असे सांगत त्यांनी शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीला कोणताही राजकीय रंग देऊ नये, असे सूचित केले.
दरम्यान, वळसे पाटील यांच्या स्पष्टीकरणानंतरही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांवर पूर्णविराम मिळेल की नाही, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
