- Hindi News
- पुणे
- पुण्यात आंदेकर टोळीवर हल्ल्याचा कट उधळला; सुरज ठोंबरे टोळीचे नाव तपासात
पुण्यात आंदेकर टोळीवर हल्ल्याचा कट उधळला; सुरज ठोंबरे टोळीचे नाव तपासात
पुण्यात आंदेकर आणि गायकवाड टोळीयुद्धाचा नवा अंक! पोलीस ताफ्याची रेकी करणाऱ्या दोघांना अटक. सुरज ठोंबरेविरोधात गुन्हा दाखल.
पुणे : पुण्यातील आंदेकर आणि गायकवाड टोळीतील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे समोर आले आहे. मकोका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कृष्णा आंदेकर, स्वराज आंदेकर आणि तुषार वाडेकर यांना न्यायालयातून नंदुरबार आणि धुळे कारागृहात नेत असताना त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट वेळेत उधळला गेला असून, या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर सुरज ठोंबरेसह तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी वेदांत रोहित सावंत (वय २१, धनकवडी) आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, कात्रज) या दोघांना अटक केली आहे. तसेच या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून सुरज अशोक ठोंबरे (रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले आणि धिरज लखारा यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय म्हस्केवरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणात कृष्णा आंदेकर, स्वराज आणि तुषार वाडेकर यांना न्यायालयातून पोलीस बंदोबस्तात नंदुरबार व धुळे कारागृहात हलविण्यात येत होते. रविवारी शिवाजीनगर न्यायालयापासूनच वेदांत आणि अथर्व यांनी दुचाकीवरून पोलीस व्हॅनचा पाठलाग सुरू केला. चाकण परिसरात एकच दुचाकी सातत्याने पाठलाग करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संशयितांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी दुचाकी जागेवर सोडून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोघांनाही ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेच्या चौकशीत या दोघांकडून महत्त्वाची माहिती समोर आली. ते पोलीस व्हॅनची रेकी करत होते आणि पोलीस ताफ्याच्या हालचालींची माहिती सतत फोनद्वारे सुरज ठोंबरे याला देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या दोघांकडे पिस्तूल असल्याचाही पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर आंदेकर टोळी आणि गायकवाड गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यानंतर आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्यांसह अक्षय म्हस्केवरील जीवघेणा हल्ला अशा सलग घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वराज आंदेकर आणि तुषार वाडेकर यांच्यासह टोळीतील अनेक प्रमुख सदस्यांना अटक केली होती.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे आंदेकर टोळीचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. दोघेही एकत्रितपणे टोळीचे कामकाज पाहत असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. सुरज ठोंबरे याला उच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली असून, तो सध्या सातारा जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. मात्र, बाहेरूनच तो टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शहर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या कटामागील संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे.
