भारतातून बांगलादेशात परतण्याची शेख हसीनांची तयारी; आत्मसमर्पणाची व्यक्त केली इच्छा

भारतात आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना डिसेंबरमध्ये मायदेशी परतण्यास तयार. ढाक्यात आत्मसमर्पणाची व्यक्त केली इच्छा; राजकीय विश्लेषकांचे लक्ष.

नवी दिल्ली:बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि अवामी लीगच्या अध्यक्षा शेख हसीना गेल्या दोन वर्षांपासून भारतात आश्रयाला आहेत. अशातच त्यांनी आगामी डिसेंबर महिन्यात आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह स्वदेशात परतण्याची आणि न्यायालयासमोर आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे बांगलादेश आणि भारत दोन्ही देशांच्या राजकीय वर्तुळात मोठी हलचल निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी डिसेंबरमध्ये ढाक्यात परतणार असल्याचे स्पष्ट केले होते. आपल्याला परत गेल्यानंतर अटक होऊ शकते किंवा फाशीची शिक्षाही सुनावली जाऊ शकते, हे ठाऊक असूनही आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, भारतामधील विश्लेषक आणि तज्ज्ञ या घोषणेकडे 'देशात निश्चित वापसीची घोषणा' म्हणून न पाहता राजकीय 'ग्राउंड टेस्टिंग' म्हणून पाहत आहेत.

बीबीसी बांग्लाने दिल्लीतील अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी, परराष्ट्र तज्ज्ञ, माजी राजनैतिक अधिकारी आणि भारतात आश्रयाला असलेल्या अवामी लीगच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार, शेख हसीना यांनी जरी डिसेंबरमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी आगामी पाच महिन्यांत राजकीय परिस्थिती कशी बदलते, बांगलादेश सरकारची भूमिका काय राहते आणि आंतरराष्ट्रीय समुदाय यावर काय भूमिका घेतो, यावरच त्यांची प्रत्यक्ष वापसी अवलंबून असेल. तसेच, हसीना यांनी जरी या निर्णयाबाबत कोणत्याही परदेशी सरकारशी सल्लामसलत केली नसल्याचे म्हटले असले, तरी भारत सरकारच्या किंवा भारताच्या परवानगीशिवाय त्यांनी हे वक्तव्य केलेले नाही, असे विश्लेषकांचे मत आहे.

भारताची भूमिका कायम; राजनैतिक अडचणी सुटण्याची शक्यता:

या संपूर्ण प्रकरणावर भारत सरकारच्या अधिकृत भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. भारताच्या परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, भारताने शेख हसीना यांना स्वतःहून कोणतेही आमंत्रण दिलेले नव्हते, ना त्यांना कोणती अधिकृत राजकीय शरण देण्यात आली होती. सुरक्षेच्या अत्यंत बिकट व विशेष परिस्थितीमुळे केवळ मानवीय दृष्टिकोनातून त्यांना आश्रय देण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ बांगलादेश सरकारने शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणासाठी (Extradition) औपचारिक व तोंडी विनंत्या केल्या असल्या, तरी भारताने त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारतीय राजनैतिक वर्तुळात असे मानले जात आहे की, शेख हसीनांची ही घोषणा म्हणजे 'एका तीर से कई निशाने' साधण्यासारखी सोची-समझी चाल आहे. जर शेख हसीना खरोखरच डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतल्या, तर गेल्या दोन वर्षांपासून भारताला सहन कराव्या लागत असलेल्या राजनैतिक अडचणीतून सुटका होईल. आणि जर त्या परतल्या नाहीत, तर 'त्यांना न्याय्य परिस्थिती नसल्यामुळे भारताने जाऊ दिले नाही' असा संदेश जाऊ शकतो. या सर्व रणनीतीमुळे चेंडू आता पुन्हा एकदा बांगलादेश सरकारच्या आणि तेथील राजकीय परिस्थितीच्या कोर्टात ढकलला गेला असून, यावर भविष्यात काय घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन

Latest News

पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन
PACL मधील गुंतवणूकदारांना परतावा मिळवण्यासाठी ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत SEBI पोर्टलावर त्रुटी दुरुस्त करण्याचे सातारा पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन....
MPSC पेपरफुटीवरील पोस्ट महागात; हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा
भारतातून बांगलादेशात परतण्याची शेख हसीनांची तयारी; आत्मसमर्पणाची व्यक्त केली इच्छा
दिल्लीतील नीट आंदोलनावरून राजकीय वाद; राहुल गांधींचे अमित शाहांवर गंभीर आरोप
भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक; पुणे पोलिसांची घरमालकांना कडक सूचना

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software