तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना इशारा; पुण्यात लाखोंचा अन्नसाठा जप्त, अनेकांवर कारवाई

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएची पुण्यात धडक कारवाई. भवानी पेठ, गणेश पेठेतून ४५ लाखांहून अधिकचा अन्नसाठा जप्त; हॉटेल परवानेही रद्द.

पुणे:अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या कारवाईच्या दणक्यात पुण्यात पुन्हा एकदा अन्न व सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम उघडली आहे. पुणे शहरातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ या परिसरांमधील विविध अन्नपदार्थ विक्रेते, गोदामांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एकाच वेळी धाडी टाकत तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित व निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त केला आहे. अन्नपदार्थ विक्रीमध्ये नियमांचे पालन न करणे, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे आणि लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या सर्व पदार्थांचे नमुने सविस्तर तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

एफडीएच्या या धडक कारवाईत गणेश पेठेतील ‘मे. वर्धमान एंटरप्रायझेस’ येथे तपासणी केली असता, अन्नामलाई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा एकूण ७ लाख ८२ हजार ९३२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला; या पदार्थांवर आवश्यक कायदेशीर माहिती व योग्य लेबलिंग नसल्याचे उघडकीस आले. याच परिसरातील ‘मे. न्यू पांडियन एंटरप्रायझेस’मधून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा ५८ हजार ६२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या मोहिमेदरम्यान भवानी पेठेतील गुरुनानक हायस्कूलजवळ असलेल्या माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामातून सर्वाधिक माल जप्त करण्यात आला असून, त्यात सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोल असा तब्बल ३६ लाख ३९ हजार ३८० रुपयांचा साठा आढळून आला. विशेष म्हणजे, या गोदामात अन्न व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक असणारा परवाना किंवा नोंदणीच नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. याशिवाय, नाना पेठेतील ‘मे. गोयल सेल्स कॉर्पोरेशन’ येथून काजू, बदाम, मनुका, मटण मसाला आणि मोहरी असा ६९ हजार ८३५ रुपयांचा माल चुकीच्या ब्रँडिंगच्या संशयावरून जप्त करण्यात आला, तर ‘मे. विजय लक्ष्मी ट्रेडर्स’ येथून राईस ‘०’ नंबर शेव आणि फरसाण जप्त करण्यात आले.

केवळ पुणेच नव्हे तर सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही एफडीएने मोठी कारवाई करत अन्न सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या पाच हॉटेल, रेस्टॉरंट आणि कँटिनचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. यामध्ये साताऱ्यातील ‘न्यू सम्राट हॉटेल’, ‘हॉटेल केशर’, ‘हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट’ आणि सांगलीतील ‘मैत्री चायनीज सेंटर’, ‘हॉटेल २५२० गावरान तडका’ यांचा समावेश आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात चक्क कृत्रिम दूध तयार करण्याचा अत्यंत गंभीर प्रकार या कारवाईदरम्यान उघडकीस आला असून, घटनास्थळावरून ५ लिटर म्हशीचे दूध आणि दुधात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे ४.४ किलो रिफाइंड पाम ऑइल जप्त करण्यात आले आहे. तुकाराम मुंढे यांच्या या सक्त आणि धडक कारवाईमुळे संपूर्ण अन्न व औषध व्यापार क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन

Latest News

पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन पीएसीएल कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे आवाहन; परताव्यासाठी ६ ऑगस्टपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन
PACL मधील गुंतवणूकदारांना परतावा मिळवण्यासाठी ६ ऑगस्ट २०२६ पर्यंत SEBI पोर्टलावर त्रुटी दुरुस्त करण्याचे सातारा पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन....
MPSC पेपरफुटीवरील पोस्ट महागात; हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा
भारतातून बांगलादेशात परतण्याची शेख हसीनांची तयारी; आत्मसमर्पणाची व्यक्त केली इच्छा
दिल्लीतील नीट आंदोलनावरून राजकीय वाद; राहुल गांधींचे अमित शाहांवर गंभीर आरोप
भाडेकरूंची माहिती देणे बंधनकारक; पुणे पोलिसांची घरमालकांना कडक सूचना

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software