बीडच्या विकासाला वेग; बीड-पुणे रेल्वेसेवेचा मार्ग सुकर होणार – सुनेत्रा पवार

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीडमध्ये सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. बीड-पुणे रेल्वेसेवा, परळी वैजनाथ विकास व शेतकरी कर्जमुक्तीच्या मोठ्या घोषणा.

बीड: छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झालेल्या ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने बीड जिल्ह्याला विकासाची नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बीड येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या बीड आणि अंबाजोगाईच्या भूमीचा कायापालट करत ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडविण्याचा दृढ संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. या शासकीय सोहळ्यापूर्वी त्यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.

     ध्वजारोहणा नंतर उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करताना भावना व्यक्त केल्या. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल १३ महिने दोन दिवसांनी, म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला होता. या रक्तरंजित आणि संघर्षाच्या काळात आपले दिवंगत वडील बाजीराव पाटील यांनी स्वतः एक मुक्तिसैनिक म्हणून सहभाग घेतला होता, ही आठवण सांगताना त्या भावुक झाल्या. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा इतिहास पुढच्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील विकासाचा विस्तृत लेखाजोखा मांडत बीडकरांना अनेक नवीन प्रकल्पांची भेट दिली.

       बीडकरांच्या दळणवळणाचा प्रश्न सोडवण्यासाठी गतवर्षी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले वचन पूर्ण करत आजपासून बीड ते थेट पुणे रेल्वे सेवेला औपचारिक सुरुवात होणार असून, या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे नूतनीकरण आणि शाळकरी मुलांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी अत्याधुनिक तारांगणाचे भूमिपूजन आज करण्यात येत आहे, असे त्यांनी जाहीर केले. धार्मिक पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ३०१ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, परळी येथे उभारण्यात आलेल्या ५६५ कोटी रुपयांच्या भव्य पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे.

      याशिवाय, जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यंदाची मानाची राज्यस्तरीय ऑलिम्पिक पदकविजेते स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा बीडमध्येच आयोजित केली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

      शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत त्यांनी दुष्काळी व विषम पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ६७ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४९१ कोटी रुपयांची रक्कम जमा करून त्यांचे सातबारे कोरे करण्यात आले आहेत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ४०० गावांची निवड झाली असून, आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध होऊन २६ गावांतील आठ हजारांहून अधिक हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात ६२३ कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन निधी उपलब्ध झाला असून, ‘महाराजस्व समाधान शिबिरांच्या’ माध्यमातून सव्वा लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे.

        आरोग्य आणि सामाजिक कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने मोठी प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या उद्दिष्टपूर्तीत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी झाली असून, ‘मिशन साथी’ उपक्रमांतर्गत ऊसतोड कामगारांना मोफत आरोग्य सुविधा आणि आयुष्मान कार्ड दिले जात आहेत. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व राहण्यासाठी ‘संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृह’ गेल्या महिन्यातच सुरू करण्यात आले आहे. ‘लेक लाडकी’ योजनेतून हजारो मुलींना आर्थिक लाभ मिळाला आहे, तर मराठवाड्यातील कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या मोहिमेत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असून हैदराबाद गॅझेटवर आधारित ५५४ अर्जांवर शंभर टक्के कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. या सर्व विकासकामांच्या माध्यमातून बीड जिल्हा प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचत असून, या प्रवासात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राज्यात दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे फडणवीसांना पत्र, शेतकऱ्यांसाठी ९ प्रमुख मागण्या

Latest News

राज्यात दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे फडणवीसांना पत्र, शेतकऱ्यांसाठी ९ प्रमुख मागण्या राज्यात दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे फडणवीसांना पत्र, शेतकऱ्यांसाठी ९ प्रमुख मागण्या
महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत द्या; शरद पवारांचे देवेंद्र फडणवीस यांना ९ मागण्यांचे पत्र....
‘सरकार शुभ तारखा पाहण्यात व्यस्त’; दुष्काळाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल
पुण्यात विश्वविक्रमाची नोंद; १२ हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक गणेशस्तोत्र पठण ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये
पुणे-ओकायामा मैत्रीला २० वर्षे; महापौर मंजुषा नागपुरेंसह पालिका अधिकारी जपान दौऱ्यावर
गणेशोत्सव-नवरात्रीसाठी मोठा निर्णय; भावडीची खाण मूर्ती विसर्जनासाठी भाड्याने

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software