अमेरिकन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक; पुण्यात बनावट कॉल सेंटरवर छापा

पुणे व हैदराबाद मध्ये ईडी आणि यूएस सिक्रेट सर्व्हिसची मोठी कारवाई. अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ३ बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश.

पुणे: देशाच्या सायबर सुरक्षेला आणि आर्थिक व्यवहारांना हादरवून टाकणारी एक मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ED) आणि अमेरिकन सिक्रेट सर्व्हिस (US Secret Service) यांनी संयुक्त मोहीम राबवत पुणे आणि हैदराबाद येथे एकाच वेळी छापे टाकले असून, अमेरिकन नागरिकांना सायबर जाळ्यात ओढून त्यांची कोटींची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पीएमएलए (PMLA) कायद्यांतर्गत १५ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाईत एकूण तीन हाय-टेक बनावट कॉल सेंटर्स उघडकीस आली असून, घटना स्थळावरून ६६ मोबाईल फोन, १३ लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणावर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

     प्राप्त माहिती नुसार, अमेरिकन नागरिकांना विविध क्लृप्त्या वापरून घाबरवणे, त्यांच्याकडून खंडणी उकळणे आणि सायबर फसवणूक करणे हे मोठे रॅकेट देशातील काही भागांतून सुस्थितीत चालवले जात असल्याची गुप्त माहिती ईडीला मिळाली होती. या पुराव्यांच्या आधारे ईडीच्या हैदराबाद झोनल ऑफिसच्या विशेष पथकाने १५ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे आणि हैदराबादमधील एकूण चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या अचानक मारलेल्या छाप्यांमध्ये हैदराबादमध्ये दोन आणि पुण्यात एक असे एकूण तीन बनावट कॉल सेंटर्स प्रत्यक्ष सुरू असल्याचे (लाईव्ह) आढळून आले. या सेंटर्समध्ये तब्बल २२० कर्मचारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत होते, जे अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना विविध कारणांनी धमकावून आर्थिक गंडा घालत होते.

      छापा टाकलेल्या या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर वर्कस्टेशन्स, क्युबिकल्स, कॉम्प्युटर्स, हेडसेट्स आणि आधुनिक नेटवर्किंगची उपकरणे थाटण्यात आली होती. एजन्सीच्या पथकाने कसून झडती घेत ६६ मोबाईल, १३ लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतर संशयी डिजिटल साहित्य जप्त केले. या सर्व उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासणीतून या रॅकेटची सविस्तर कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) समोर येत आहे. या कॉल सेंटर्समधील २२० कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नेमकी भूमिका काय होती, ते कोणाच्या आदेशानुसार काम करत होते आणि त्यांचे रिपोर्टिंग स्ट्रक्चर कसे होते, याचा सखोल तपास आता ईडीकडून केला जात आहे.

पुण्यासह पटियाला आणि चंदीगड कनेक्शनचा शोध

      या संपूर्ण गैरव्यवहारात पुण्यात चालणाऱ्या कॉल सेंटरचा संबंध पंजाबमधील पटियाला आणि चंदीगडशी जोडला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ईडीने चंदीगड मधील एका पॉश निवासी संकुलावरही धाड टाकली असून, पटियाला येथील कॉल सेंटरचे कामकाज व संपूर्ण नियंत्रण पाहणाऱ्या एका मुख्य सूत्रधाराकडून (मास्टरमाइंड) या ठिकाणाचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणाहूनही कॉल सेंटरच्या व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची डिजिटल कागदपत्रे व उपकरणे हाती लागली आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकन डॉलर्समध्ये बेकायदेशीररीत्या गोळा केलेली रक्कम भारतीय रुपयांमध्ये परावर्तित (कन्व्हर्ट) करून ती वेगवेगळ्या खात्यांवर वळविण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत गुंतलेल्या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे.

       पुण्यातील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना कोणत्या प्रकारे टार्गेट केले जात होते, या गुन्ह्यामागील आर्थिक लाभाचे जाळे कुठेकुठे पसरले आहे आणि या आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या रॅकेटचे जागतिक स्तरावर इतर कोणते धागेदोरे आहेत, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी आपली चक्रे वेगाने हालवली आहेत. या संयुक्त कारवाईमुळे सायबर गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली असून, लवकरच यामागील मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

राज्यात दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे फडणवीसांना पत्र, शेतकऱ्यांसाठी ९ प्रमुख मागण्या

Latest News

राज्यात दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे फडणवीसांना पत्र, शेतकऱ्यांसाठी ९ प्रमुख मागण्या राज्यात दुष्काळ जाहीर करा; शरद पवारांचे फडणवीसांना पत्र, शेतकऱ्यांसाठी ९ प्रमुख मागण्या
महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत द्या; शरद पवारांचे देवेंद्र फडणवीस यांना ९ मागण्यांचे पत्र....
‘सरकार शुभ तारखा पाहण्यात व्यस्त’; दुष्काळाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल
पुण्यात विश्वविक्रमाची नोंद; १२ हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक गणेशस्तोत्र पठण ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये
पुणे-ओकायामा मैत्रीला २० वर्षे; महापौर मंजुषा नागपुरेंसह पालिका अधिकारी जपान दौऱ्यावर
गणेशोत्सव-नवरात्रीसाठी मोठा निर्णय; भावडीची खाण मूर्ती विसर्जनासाठी भाड्याने

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software