- Hindi News
- पुणे
- मोहम्मदवाडीत पोलिसांची कारवाई; १४ लाखांचा साऊंड साहित्यसाठा जप्त
मोहम्मदवाडीत पोलिसांची कारवाई; १४ लाखांचा साऊंड साहित्यसाठा जप्त
पुण्यात ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या साऊंड सिस्टीमवर काळेपडळ पोलिसांची कारवाई; १४ लाखांचे साहित्य जप्त. साऊंड व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा.
पुणे: गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यभर उत्साहाचे वातावरण असतानाच ध्वनि प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मंडळांवर पुणे पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील मोहम्मदवाडी परिसरात गणपती स्थापना मिरवणुकीदरम्यान ठरवून दिलेली मर्यादा ओलांडून अवाजवी आणि कर्णकर्कश आवाजात प्लाझ्मा साऊंड सिस्टीम वाजविणाऱ्या एका गणेश मंडळावर काळेपडळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम आणि ती वाहून नेणारा टाटा ७०९ ट्रक असा एकूण तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या एकाच कारवाईमुळे शहरातील विनापरवाना व नियमबाह्य डीजे वाजविणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मोहम्मदवाडी परिसरातील शंभू कॉलनी येथील शेल पेट्रोल पंपाजवळ १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गणपती स्थापना मिरवणुकीत अतिउच्च आवाजात प्लाझ्मा साऊंड सिस्टीमचा दणदणाट सुरू असल्याची खात्रीशीर माहिती काळेपडळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने साऊंड सिस्टीमच्या आवाजाची व क्षमतेची तपासणी केली. तपासणीत डेसिबलच्या मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावले उचलली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे सात लाख रुपये किमतीचा टाटा ७०९ ट्रक आणि अन्य सात लाख रुपये किमतीची साऊंड सिस्टीम जप्त केली. जप्त केलेल्या उपकरणांमध्ये दोन बेस, दोन टॉप, मिक्सिंग मशीन आणि प्लाझ्मा सिस्टीमचा समावेश आहे. आगामी काळातही गणेशोत्सवात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
साऊंड व्यावसायिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा एकीकडे पोलिसांकडून ध्वनि प्रदूषणावरून साऊंड सिस्टीम जप्त करण्याची कारवाई तीव्र केली असतानाच, दुसरीकडे या सततच्या कारवाईमुळे आणि प्रशासकीय भूमिकेमुळे आर्थिक संकट आलेल्या साऊंड व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साऊंड, डीजे, लाईट, मंडप, जनरेटर, इव्हेंट आणि या क्षेत्राशी संबंधित शेकडो व्यावसायिकांनी एकत्र येत बुधवारी (दि. १६) पुण्यात एक प्रभावी मूक मोर्चा काढला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (पुणे स्टेशन) येथून या शांततापूर्ण मोर्चाची सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
दुपारी बारा ते तीन या वेळेत काढण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यावसायिक सहभागी झाले होते. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून व्यवसाय करण्याची आमची पूर्ण तयारी आहे, अशी भूमिका यावेळी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मांडली. परंतु, नियमांची पूर्तता करूनही विनाकारण साहित्य जप्त करणे आणि पोलिसांकडून होणारी दमदाटी यामुळे लहान व्यावसायिकांसमोर आणि कामगारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे, अशी व्यथा यावेळी मांडण्यात आली. लोकशाही मार्गाने आणि पूर्णपणे शांततेत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चानंतर व्यावसायिकांनी प्रशासनाला आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. एकीकडे पोलीस ध्वनिप्रदूषणावर कडक नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत, तर दुसरीकडे व्यावसायिक आपल्या रोजीरोटीच्या रक्षणासाठी आक्रमक झाल्यामुळे पुणे शहरातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीमचा हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
