- Hindi News
- पुणे
- पुणे महापालिकेचा दणका; गणेशोत्सवातील आरोग्य-हिरकणी कक्षांच्या ४ निविदा रद्द
पुणे महापालिकेचा दणका; गणेशोत्सवातील आरोग्य-हिरकणी कक्षांच्या ४ निविदा रद्द
पुण्यातील विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने नियम डावलून काढलेल्या १ कोटीच्या ४ संशयास्पद निविदा अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी केल्या रद्द.
पुणे: पुणे शहरातील आगामी गणेशोत्सव मिरवणुकी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या आरोग्य कक्ष, हिरकणी कक्ष आणि बॅरिकेटिंगच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्चिक खेळ रचणाऱ्या प्रभाग समिती स्तरावरील एका संशयास्पद प्रस्तावाला महापालिका प्रशासनाने दणका दिला आहे. विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने झोन ५ च्या अंतर्गत तुकड्यांमध्ये काढण्यात आलेल्या तब्बल एक कोटी रुपयांच्या चार स्वतंत्र निविदा अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी अखेर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. एकाच स्वरूपाच्या आणि एकाच प्रभागातील कामासाठी २१ लाखांच्या चार वेगवेगळ्या निविदा काढून स्थायी समितीची मंजुरी टाळण्याचा आणि प्रभाग पातळीवरच एक कोटी रुपयांचा विहित निधी खर्च करण्याचा हा डाव ‘सजग नागरिकांमुळे’ उघडकीस आल्याने पुणे महानगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गणेशोत्सवाच्या मुख्य मिरवणूक मार्गावर येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पश्चिमकडील भागात हिरकणी कक्ष, स्वागत मंडप आणि सुरक्षात्मक बॅरिकेटिंग करण्यासाठी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाने प्रत्येकी २१ लाख १८ हजार रुपयांच्या चार स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवल्या होत्या. यासाठी महापौर निधीतून प्रभाग क्रमांक २५ मधील चारही नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी लॉकिंग करून देण्यात आला होता. नियमानुसार २५ लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाच्या निविदांना मंजुरी देण्याचे अधिकार केवळ प्रभाग समित्यांना प्राप्त आहेत. याच नियमाचा गैरफायदा घेत एक कोटी रुपयांच्या एकूण खर्चाचे चार समान भाग करून २१ लाखांच्या चार स्वतंत्र निविदा राबवण्यात आल्या, जेणेकरून हा विषय मोठ्या स्थायी समितीसमोर न जाता प्रभाग पातळीवरच मंजूर करून घेता येईल. या संपूर्ण कार्यपद्धतीमुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र संशय व्यक्त केला जात होता.
मिरवणूक मार्गावर महापालिकेची स्वतःची अनेक कार्यालयं, दवाखाने आणि जुन्या शैक्षणिक संस्था उपलब्ध असताना तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आधीच १५ सुसज्ज रुग्णवाहिका आणि ३ आयसीयू बेडची सुसज्ज सुविधा आपत्कालीन परिस्थितीसाठी तैनात केली जात असताना, या नवीन कक्ष उभारणीच्या निविदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. प्रशासनाने यापूर्वी कधीही गणेशोत्सवाच्या वेळी स्वतंत्र हिरकणी कक्ष उभारलेले नव्हते. त्यामुळे हा सर्व खटाटोप केवळ राजकीय निधी विल्हेवाटीसाठी चालला असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत वृत्तपत्रांमधील तीव्र पडसाद आणि ‘सजग नागरिक मंच’च्या आक्षेपांनंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी यावर कठोर भूमिका घेतली.
यांसंदर्भात विचारणा केली असता अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी एकाच प्रभागात आणि एकाच प्रकारच्या कामासाठी चार स्वतंत्र निविदा काढणे पूर्णपणे चुकीचे आणि अनपेक्षित असल्याचे मान्य केले. त्यांनी तत्काळ विश्रामबाग क्षेत्रीय आयुक्तांना या सर्व निविदा रद्द करण्याचे आदेश दिले असून, या संपूर्ण कामासाठी एकत्रितपणे केवळ एकच निविदा काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या झोन ५ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधीच विविध खासगी संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत कक्ष उभारले जात असताना, महापौर निधीतून नगरसेवकांना भरभक्कम निधी उपलब्ध करून देऊन अशा प्रकारे स्वतंत्र निविदा काढण्याच्या उद्देशावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार उलटसुलट चर्चा झडत आहेत. अतिरिक्त आयुक्तांच्या या धडक निर्णयामुळे महापालिकेतील भ्रष्ट व संशयास्पद उधळपट्टीला तात्पुरता का होईना, मोठा आळा बसल्याचे मानले जात आहे.
