- Hindi News
- देश
- नीट प्रकरणी दिल्लीत जरांगे पाटलांची सिंहगर्जना! अभिजीत दीपके यांची भेट घेऊन लढ्याला बळ
नीट प्रकरणी दिल्लीत जरांगे पाटलांची सिंहगर्जना! अभिजीत दीपके यांची भेट घेऊन लढ्याला बळ
दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET परीक्षा घोटाळ्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा. CJP संस्थापक अभिजीत दीपके यांची भेट घेऊन केंद्र सरकारला दिला इशारा.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर 'नीट' (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी गेल्या महिनाभरापासून पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांचा थेट आणि खंबीर पाठिंबा मिळाला आहे. आज प्रत्यक्ष जंतर-मंतर मैदानात पोहोचून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा मुख्य चेहरा असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांची व्यासपीठावर भेट घेतली. या वेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदवला. यापुढील काळात विद्यार्थ्यांना धक्का जरी लागला, तर संपूर्ण मराठा समाज आणि महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा हुंकार भरत त्यांनी आंदोलकांना कोणत्याही परिस्थितीत जंतर-मंतर मैदान न सोडण्याचे आवाहन केले.
जंतर-मंतर येथील व्यासपीठावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने लढण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाच्या माध्यमातून शांततापूर्ण आंदोलनाची अथांग ताकद संपूर्ण देशाने पाहिली आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अजिबात खचून न जाता आपला न्याय्य लढा सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या मतांवरच सत्तेत आले आहे; त्यामुळे तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचाआवाज दडपण्याचा कोणताही अधिकार सरकारला नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनाचे कान उपटले.
केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाला सज्जड दम भरताना जरांगे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी हे आंदोलन मागे घेता कामा नये. जर सरकारने बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा किंवा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर वेळ पडल्यास महाराष्ट्रातून लक्षावधी मराठा बांधव थेट दिल्लीत धडकतील आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी रस्त्यावर उतरतील. मनोज जरांगे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जंतर-मंतरवरील आंदोलनाला आता मोठे राष्ट्रीय वळण मिळाले असून केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
