- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला १० वर्षे; मुंबईत भव्य सत्कार
रामदास आठवले यांच्या मंत्रीपदाला १० वर्षे; मुंबईत भव्य सत्कार
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या १० वर्षेपूर्तीनिमित्त मुंबईत नागरी सत्कार. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गौरव.
मुंबई: सामाजिक चळवळ, संघटनबांधणी आणि लोकाभिमुख राजकारणाच्या जोरावर राष्ट्रीय राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एका दिमाखदार सोहळ्यात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख हस्ते आणि विविध दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला. यावेळी रामदास आठवले म्हणजे संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे एक प्रभावी नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
या विशेष कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह रामदास आठवले यांचे कुटुंबीय आणि राज्यभरातून आलेले त्यांचे चाहते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दलित पँथर चळवळीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या एका सच्चा कार्यकर्त्याचा प्रवास असल्याचे यावेळी वक्ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना सांगितले की, संघर्षातून नेतृत्व घडले असले तरी त्यांच्या स्वभावात किंवा व्यक्तिमत्त्वात कधीही कटुता आली नाही. सर्व समाज घटकांशी संवाद साधणे, सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे आणि लोकांना आपलेसे करण्याची त्यांची हातोटी ही त्यांच्या यशाची सर्वात मोठी ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी एकनिष्ठ राहत त्यांनी सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा नेहमीच प्रचार केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, आठवले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी आहेत. गेल्या दहा वर्षांत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची धुरा अत्यंत यशस्वीपणे सांभाळत त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीपासून ते ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार नेहमीच स्मरणात राहतील.
या कार्यक्रमात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, अण्णा बनसोडे आणि प्रवीण दरेकर यांनीही मनोगत व्यक्त करत आठवले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकला. तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देणारे लोकनेते म्हणून त्यांनी देशभर आपला ठसा उमटवल्याचे मान्यवरांनी सांगितले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या संपूर्ण राजकीय व सामाजिक प्रवासाचा आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, आर्थिक आणि न्याय्य विचारांनी प्रेरित होऊन आपण नेहमीच सार्वजनिक जीवनात काम केल्याचे त्यांनी सांगितले. दलित पँथर चळवळीपासून ते केंद्रातील मंत्रिपदापर्यंतच्या प्रवासात सर्वसामान्य आणि वंचित घटकांसाठी झटल्याचे सांगत, समाजहित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या निर्णयांसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. भविष्यातही समता, विकास आणि सामाजिक न्यायासाठी आपली बांधिलकी अशीच कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
