- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- पुण्यात लक्ष्मण हाके-नवनाथ वाघमारे आक्रमक; सरकारच्या भूमिकेवर नाराजी
पुण्यात लक्ष्मण हाके-नवनाथ वाघमारे आक्रमक; सरकारच्या भूमिकेवर नाराजी
पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची आक्रमक पत्रकार परिषद. सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी; राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा.
पुणे: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौरैनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका घेत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी हताश होत, "आता बस झालं, आम्ही हरलो आहोत," असे म्हणत ओबीसी नेते आणि मंत्र्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा यशस्वी पार पडला असून या दौर्यात त्यांना मोठा जन प्रतिसाद मिळाला. या दरम्यान जरांगे यांनी भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी पुण्यात अत्यंत भावुक होत, ओबीसी नेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये आणि शांत राहावे, असे आवाहन केले होते. बावनकुळे यांच्या या भूमिके नंतर शुक्रवारी पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांच्या मनातील तीव्र नाराजी प्रकर्षाने जाणवली. ते म्हणाले की, आता आम्ही थकून गेलो आहोत आणि आम्ही या लढ्यात हरलो आहोत. ना कोणते ओबीसी नेते यावर काही बोलत आहेत, ना ओबीसी मंत्री आपली बाजू मांडत आहेत. आमच्या पाठीशी उभे राहण्याची तयारी कुणाही नेत्याची दिसत नाही, त्यामुळे आम्ही हरलो आहोत, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगत असल्याचे हाके यांनी नमूद केले.
याच पत्रकार परिषदेत नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अतिशय आक्रमक आणि घणाघाती टीका केली. जरांगे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना वाघमारे म्हणाले की, ते एखाद्या कुपोषित बालकासारखे बोलत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आमचा डीएनए असल्याचे सांगतात, मात्र ओबीसी समाजाने विश्वासाने त्यांना भरभरून मते दिली असताना आता आमच्या नेत्यांच्या व्यंगावर आणि कुटुंबावर टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गप्प बसणार नाही, अशी भूमिका घेत वाघमारे यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता आम्ही राज्यभर फिरणार असून थेट ओबीसी समाजाशी संवाद साधणार आहोत, असे जाहीर करत त्यांनी आगामी संघर्षाचे संकेत दिले आहेत.
