- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प
छत्रपती संभाजीनगर येथील भव्य तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील पाणी मराठवाड्यात आणून दुष्काळमुक्तीचा संकल्प जाहीर केला.
छत्रपती संभाजीनगर: युवाशक्तीच्या नवसंशोधनातील अतुलनीय योगदानामुळे उद्याचा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश आज जगात एक बलशाली आणि संपन्न राष्ट्र म्हणून नावारूपाला येत आहे, असे सांगत त्यांनी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनी मार्गे मराठवाड्यात आणून मराठवाडा सुजलाम-सुफलाम करू आणि इथल्या पुढच्या पिढीला कधीही दुष्काळ पाहू देणार नाही, असा अत्यंत महत्त्वाचा संकल्प छत्रपती संभाजीनगरच्या धरतीवर जाहीर केला.
‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा जोतिबा फुले पुतळा (संभाजीपेठ) ते क्रांती चौक यादरम्यान एका भव्य व ऐतिहासिक तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, रोहयो व पणन मंत्री जयकुमार रावल, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, खासदार स्मिता वाघ, आमदार रवींद्र चव्हाण, प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, मंगेश चव्हाण, राम भदाणे, महापौर समीर राजुरकर यांच्यासह उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि अथांग जनसमुदाय उपस्थित होता.
रॅलीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निघालेली ही भव्य रॅली क्रांती चौकात समाप्त झाली. क्रांती चौकातील विशाल जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “तिरंगा ही आमची आन, बान आणि शान आहे. या तिरंग्यासाठी हजारो देशभक्तांनी आपले बलिदान दिले आहे. हा तिरंगा म्हणजेच आमची खरी ओळख आहे. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा यात्रा काढून मातृभूमीचे देशप्रेमाने दर्शन घडवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला संदेश नागरिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला आहे.” छत्रपती संभाजी नगरमधील या तिरंगा रॅलीने गर्दीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडून काढले असून संपूर्ण शहरात तिरंग्याचे अभूतपूर्व वादळ पाहायला मिळत आहे, अशा शब्दांत त्यांनी संभाजीनगर वासियांच्या देशप्रेमाचे भरभरून कौतुक केले.
गेल्या दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळाली असून जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राज्याची अर्थव्यवस्था ५० लाख कोटी रुपयांपर्यंत नेल्याचे नमूद केले. देश बदलतोय, राज्य बदलतंय आणि त्यासोबतच मराठवाड्याचे चित्रही वेगाने बदलत आहे. तरुणांच्या नवसंशोधनाच्या जोरावर आपण देशात तिसरी स्टार्टअप इकोसिस्टम उभी केली असून, याच तरुणशक्तीच्या बळावर भारत ‘विकसित भारत’ म्हणून फिनिक्स भरारी घेत आहे, असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले असल्याचे आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले की, आपण आपल्या हक्कांसोबतच देशासाठीची कर्तव्येही कायम लक्षात ठेवली पाहिजेत. मराठवाड्याला देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले असून, निजाम शाहीच्या राजवटीतून मुक्ती मिळवण्यासाठी हजारो देशभक्तांनी रक्ताचे पाणी केले आहे. त्यांचे स्मरण करून आज आपण देशासाठी, राज्यासाठी आणि समाजासाठी प्रामाणिकपणे जगण्याची प्रतिज्ञा करूया, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ व राज्यगीताने झाली, तर राष्ट्रगीताने या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक, तरुण-तरुणी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध ढोल-लेझीम व संबळ पथकांच्या निनादात दुमदुमलेल्या या रॅलीने संपूर्ण शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळाले.
